ज्येष्ठ पत्रकार सोमनाथ पाटील यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार व दैनिक सकाळचे माजी सहसंपादक सोमनाथ पाटील यांचे गुरूवारी सकाळी दादर येथील शुश्रुषा रूग्णालयात उपचार घेत असतानाच दुःखद निधन झाले. निधनासमयी ते ६४ वर्षाचे होते. रात्री आठ वाजता सायन हॉस्पिटल समोरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
सोमनाथ पाटील यांनी १९७७ पासून मराठी वृत्तपत्रसृष्टीत विविध दैनिकांत सहसंपादक, वृत्तसंपादक, कार्यकारी संपादक या पदावर काम केले. वृत्तपत्रात स्तंभलेखन, विश्लेषण या स्वरूपाचे लेखन त्यांचे नियमितपणे सुरू होते. १९७८ ते २००१ या काळात सकाळ माध्यम समुहात उपसंपादक ते सहसंपादकपदापर्यंत नोकरी केली. दै गावकरी व दै एकमत मध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. लोकसेवा आयोगामार्फत निवड झाल्यानंतर शासनाच्या नगरविकास विभागाच्या अंतर्गत दोन वर्षे नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून सेवा केली. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेत संपादक व विभागीय संचालक म्हणून अनेक वर्षे काम केले. पत्रकारितेच्या निमित्ताने देश विदेशात प्रवास केला. हाँग काँगच्या ऐतिहासीक हस्तांतर सोहळयास उपस्थिती व त्या वार्तांकनाबद्दल बॅ नाथ पै पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तिसरी मुंबई या नगरविकासावरील पुस्तकास मुंबई मराठी पत्रकार संघाचा अप्पा पेंडसे पुरस्कार मिळाला. सहा मराठी व इंग्रजी पुस्तकांचे लेखन केले. मुंबई मराठी पत्रकार संघ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि एसएनडीटी विद्यापीठांच्या पत्रकारिता अभ्यासक्रमांच्या अध्यापनाचा अनुभव होता. मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. त्यांच्या पश्चात चिरंजीव प्रदीप पाटील कन्या डॉ अनिता पाटील स्नुषा नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधानंतर सर्वच पत्रकार संघटनांनी शोक व्यक्त केला.