शहरी भागासह ग्रामीण भागालाही फायदा

ठाणे : कल्याण – तळोजा या मेट्रो 12 मार्गाच्या कामाला गती देण्याची आग्रही मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्गाचा हा विस्तारित मार्ग असून यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीणचा भाग आणि तळोजा हे एकमेकांना थेट जोडले जातील. त्याचा नागरी वस्तीसह ग्रामीण भागालाही फायदा होणार आहे असे खासदारांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरात विविध मेट्रो मार्गांची उभारणी केली जाते आहे. या मार्गांमुळे प्रवास सुखकर झाला आहे. तर विविध मार्गांवर येत्या काळात प्रवास सोयीचा आणि जलद होणार आहे. ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्गाचा विस्तारीत भाग असलेल्या कल्याण – डोंबिवली – तळोजा ( मेट्रो 12) या मार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मेट्रोसाठी आग्रही आहेत. या मेट्रो मार्गामुळे ठाणे शहरातला प्रवासी भिवंडी ते कल्याण आणि कल्याण येथील प्रवासी थेट तळोजा आणि नवी मुंबईला जोडला जाणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या उभारणीला महत्व प्राप्त झाले आहे. या एकूण 20.75 किलोमीटरच्या मार्गात 17 स्थानक नियोजीत करण्यात आले आहेत. कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून हा मार्ग सुरू होणार आहे. तर पुढे डोंबिवलीतील विविध गावे आणि मानपाडा मार्गे कल्याणच्या ग्रामीण भागातून हा मेट्रो मार्ग जाणार आहे. तळोजा हे या मार्गातील अंतिम स्थानक आहे. या मार्गामुळे शहरी भागासह ग्रामीण भागही मेट्रोला जोडला जाणार आहे. या प्रकल्पासाठी यापूर्वीच सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यासाठी सल्लागार समितीला तातडीचे योग्य ते निर्देश द्यावेत आणि कामाला सुरुवात करावी, अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. त्यासाठीचे लेखी निवेदन त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!