मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उद्या शनिवार, दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत फक्त महिलांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार आहे.
मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महानगरपालिका रुग्णालये तसेच कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर महिलांना कोविड लस घेता येणार आहे. यावेळी कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा देखील घेता येणार आहे. फक्त महिलांसाठी राखीव विशेष सत्र असल्यामुळे उद्यासाठीची ऑनलाईन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.
कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध घटकांकरिता विशेष सत्र राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र होणार आहे. या राखीव सत्राचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.