ठाणे, दि. १२ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी लसीकरणाची विशेष मोहिम कालपासून राबविण्यास सुरूवात झाली असून दि. १८ नोव्हेंबरपर्यंत ती सुरू राहणार आहे. या महिन्याअखेरपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांचे पहिला डोस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून या त्याबाबत काल आढावा घेण्यात आला.
अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे, जिल्हा लसीकरण अधिकारी ड़ॉ. अंजली चौधरी, महापालिकांचे आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
मध्यंतरीच्या काळात शेतीची कामे, दिवाळी सण यामुळे लसीकरणाची गती मंदावली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हा लसीकरण टास्कफोर्सची बैठक घेऊन दिवाळीनंतर लसीकरणाला वेग देण्यासाठी विशेष मोहिम घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार काल पासून या मोहिमेस सुरूवात झाली असून १८ नोव्हेंबरपर्यंत ती राबविण्यात येणार आहे.
काल झालेल्या बैठकीत विशेष लसीकरण मोहिमेसोबतच हर घर दस्तक या मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. लसीकरण मोहिमेला चालना देतानाच नागरिकांना लस घेण्यासाठी मार्गदर्शन करावे यासाठी आरोग्य विभागासोबतच शिक्षण, ग्रामपंचायत, महिला व बालविकास यासारख्या अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील सहकार्य करावे, असे अपर जिल्हाधिकारी रानडे यांनी सांगितले.
कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार जिल्ह्यात पहिला डोस झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे ८५ लाख ७३ हजार एवढी (सुमारे ७७ टक्के) असून २९ लाख ८३ हजार (सुमारे ४० टक्के) नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांचा पहिला डोस पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना रानडे यांनी दिल्या. रेल्वे स्टेशन, आठवडे बाजार याठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून लसीकरणाला वेग देण्यासाठी प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.