मुंबई, दि. 20 : कोविडच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे महाविद्यालय ऑनलाईन सुरू होती. शैक्षणिक संस्थानी अडचणीच्या काळात सुद्धा विद्यार्थी हित जोपासून ऑनलाइन शिक्षण दिले. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहिला आहे. ऑफलाइन महाविद्यालय सुरू होत असताना एकही विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

माटुंगा येथे वीर जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सामंत बोलत होते. यावेळी रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरु डॉ.अनिरुध्द पंडीत, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, व्ही.जे.टी.आय. संचालक डॉ. धिरेन पटेल, उपसंचालक डॉ. सुनिल भिरुड, सहसंचालक डॉ.प्रमोद नाईक उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत म्हणाले, महाराष्ट्रातील नामवंत संस्थांचे नाव आजही देशपातळीवर घेतले जात. त्याचा अभिमान महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता देश आणि परदेशात सुद्धा दाखवू. वीर जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेचे योगदान मोठे असल्याचे सामंत यांनी सांगितले. सामंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे स्वागत केले. पालक आणि विद्यार्थी यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी महाविद्यालयांनी आपल्या कुटुंबातील मुलांसारखी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. महाविद्यालयांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा कोविडसंदर्भातील सर्व नियमांचे पालन करावे आणि काळजी घ्यावी. निरोगी आयुष्य जगावे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!