मैत्री केवळ एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी करावी असे थोडीच आहे. मुक्या अन जायबंदी जीवांशी मित्रत्वाचे नाते जपत त्यांच्यावर प्रेमाची मुक्त उधळण करणारे काही अनोखे मित्र आपल्या अवतीभवती आहेत. मैत्रीमधील निर्व्याज प्रेम आणि नि:स्वार्थीपणा काय असतो हे ते आपणास शिकवितात.डोंबिवलीतील प्राणी मित्र निलेश भणगे हे त्यापैकीच एक आहेत.प्राणी कल्याण आणि वन्यजीव पुनर्वसन या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, डोंबिवली तर्फ़े पॉज चे संस्थापक निलेश भणगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा लेख.
भारतात पशू कल्याण मूव्हमेंटची सुरूवात झाली त्या सुरवातीच्या काळापासून, वयाच्या १८ व्या वर्षी निलेश भणगे यांनी प्राणी कल्याणाचे काम सुरु केले. गेली २५ वर्षे निलेश हे वन्यजीव पुनर्वसनात कार्यरत असून तीन हजार च्या वर वन्यजीवांना मदत करण्यात यश मिळवले आहे.१९९८ ला एका कबुतर वाचवण्याचे काम त्यांनी सुरुवातीला केले. २०२२ मध्ये जार मध्ये अडकलेल्या बिबट्याला सोडवण्याचा मोहीमेत त्यांचा सहभाग होता.
पॉज या संस्थेची स्थापना
२००१ मध्ये निलेश यांनी ठाणे जिल्ह्यात प्लांट अँड अनिमल वेल्फेअर म्हणजे पॉज ह्या संस्थेची स्थापना केली. कल्याण-डोंबिवली ते बदलापूर या परिसरात प्रथमच अशी संस्था कार्यरत केली. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ठाणे जिल्ह्यातील पहिली पशु रुग्णवाहिका सुरू केली आणि रस्त्यावर पडलेल्या घायाळ आणि आजारी पशु-पक्षी जवळील हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी सोय करून दिली. गेल्या २२ वर्षांत निलेश ह्यांनी नवीन संस्थाना आतापर्यंत ५ रुग्णवाहिका भेट म्हणून दिल्या आहेत आणि संस्थेकडे सध्या वन्यजीव आणि रस्त्यावरील भटक्या जनावरांना वेगळ्या रुग्णवाहिका कार्यरत आहेत.
लिम्का बुकमध्ये नोंद
२००५ मध्ये त्यांचा कार्याची दखल घेऊन लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ‘भारतातील सर्वात तरुण प्राणी पुनर्वसन टीम’ म्हणून नाव नोंदले आहे. निलेशना आतापर्यंत विविध पुरस्कार मिळाले असून विशेष उल्लेख म्हणजे अमेरिकेतील पेटा च्या संस्थापक इनग्रीड न्यूकर्क ह्यांनी २००७ मध्ये ‘हिरो टू अनिमल्स’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. इनरव्हील क्लब तर्फे २०१३ मध्ये ‘समाजासाठी उत्कृष्ट सेवा’ तर २०१२ मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन अनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन तर्फे गोव्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ह्यांच्या उपस्थितीत ‘स्वयंसेवक संबंध पुरस्कार’ ही मिळाला आहे.२०१० मध्ये माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी मुरबाड येथे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे पशु रुग्णालय निलेश यांना चालवायला दिले ते आतापर्यंत अविरत सुरू असून दरवर्षी हजारो प्राण्यांना मेडिकल केअर आणि जीवनदान दिले जाते. या रुग्णालयात पशुवैद्यक साठी विविध ट्रेनिंग प्रोग्रॅम निलेश ठेवत असतात.
तीन हजारच्या अधिक वन्यजीवांना मदत
ठाणे जिल्ह्यातील प्रथम ‘गॅस अनेस्थेशिया’ वरील वर्कशॉप निलेश ह्यांनी ह्या वर्षी ठेवले होते त्यात २४ पशु वैद्यकीय डॉक्टरानीं भाग घेतला होता.गेली २५ वर्षे निलेश वन्यजीव पुनर्वसनात कार्यरत असून तीन हजार च्या वर वन्यजीवांना मदत करण्यात यश मिळवले आहे त्यात साप, हरिण, कोल्हा, पक्षी इत्यादीचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पाळीव हत्तीवर निलेश ह्यांनी रिसर्च केले असुन त्याचे चार रिसर्च रिपोर्ट प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा या रिपोर्ट मुळे मुंबई ठाणे आणि पुणे येथील भीक मागण्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या हत्तींनवर बंदी घालण्यात आली.
१२ सिंह २ वाघांची सर्कसमधून मुक्तता
निलेश हे स्वतः वन्यजीव फोटोग्राफर असून ते आणि भारतातील प्रख्यात फोटोग्राफर विविध शाळांसाठी मोफत वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन भरवत असतात. सुमारे ३०० छायाचित्रे संग्रही आहेत. निलेश यांनी २००४ साली नॅशनल सर्कस मधून १२ सिह आणि २ वाघ मुक्त करून बंगलोरला केन्द्र सरकार च्या पुनर्वसन केंद्रात पाठवले आहे. निलेश हे ‘स्वयंसेवक व्यवस्थापन’ आणि ‘मीडिया व्यवस्थापन’ ह्या विषयांवर आशियातील प्रमुख कॉन्फरन्समध्ये वर्कशॉप घेत असतात. आतापर्यंत सिंगापूर, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, नेपाळ आणि हॉंगकॉंग मध्ये विविध वन्यजीव आणि पशुकल्याण कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सादरीकरण केले आहे. त्यांचा ह्या कार्याची दखल अमेरिकन रेडिओ आणि वृत्तपत्रे, ब्रिटन मधील वृत्तपत्रे यांनी देखील घेतली आहे. आतापर्यंत २००० च्या वर स्वयंसेवकांना वन्यजीव आणि पशु कल्याण मध्ये निलेशनी ट्रेनिंग दिले आहे. प्राणी मित्र निलेश भणगे यांचे नेहमीच कौतूक होत आहे.