डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील स्टार कॉलनीत राहणाऱ्या एका सोनाराने ऑक्टोबरमध्ये त्याच्या दुकानातील १९१९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे १ कोटी ५ लाख ५४ हजार ५०० रूपये किंमतीचे दागिने ठाण्यातील एका सराफाला सफाई आणि कलाकुसरीसाठी ऑक्टोबरमध्ये दिले होते. या सराफाने हे दागिने मूळ मालकाला अंधारात ठेऊन परस्पर दुसऱ्या सोनाराकडे गहाण ठेऊन त्या बदल्यात ५० लाख रूपये घेतले. डोंबिवलीच्या मूळ सोनाराला त्याचे सोन्याचे दागिने किंवा त्या बदल्यात पैसे देण्याचे नाकारल्याने या दोन्ही जवाहिऱ्यांच्या विरोधात मंगळवारी मानपाडा पोलिस ठाण्यात अफरातफरीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार सुरेश हंसराज सोनी (४१) यांचे डोंबिवलीतील मानपाडा रोडला असलेल्या स्टार कॉलनी-सांगाव भागात पुष्पदीप नावाचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. दुकानातील दागिने ते नेहमी ठाण्यातील टेंभीनाक्यावरील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या लेजर ॲन्ड शोल्डर या दुकानाचे मालक सुरेशकुमार जैन यांच्याकडे सफाई आणि कलाकुसरीसाठी देतात. ऑक्टोबरमध्ये सोनी यांनी नेहमीप्रमाणे दुकानातील १९१९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, मणिहार, सोनसाखळी, आदी १ कोटी ५ लाखांचा ऐवज ठाण्यातील सोनार सुरेशकुमार भागचंदजी जैन (५२) यांच्या ताब्यात दिला. महिनाभरात हे दागिने दुरूस्त करून देण्याचे आश्वासन जैन यांनी सोनी यांना दिले. अनेक दिवस उलटून जैन दागिने परत करत नाहीत म्हणून सोनी यांनी दागिने परत करण्याचा तगादा लावला. जैन यांनी आपले वडील आजारी आहेत, त्यांच्यासाठी रुग्णालयात जावे लागते, अशी कारणे सांगून दागिने परत करण्यास टाळाटाळ केली.
दरम्यानच्या काळात जैन यांनी सोनी यांना न सांगता त्यांचे १९१९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मुंबईतील एल्फिस्टन रोड येथील राजेश सुकनराज जैन (५१) या विक्री व्यवस्थापकाकडे सहा महिन्यांच्या अवधीसाठी गहाण ठेवले. त्या बदल्यात सुरेशकुमार यांनी राजेश यांच्याकडून ५० लाख रूपये घेतले. सहा महिने उलटून सुरेशकुमार दागिने सोडविण्यासाठी येत नसल्याचे पाहून राजेश यांनी सुरेशकुमार यांची वाट न पाहता ते दागिने मोडून टाकले. सुरेश सोनी यांनी ठाण्यातील सुरेशकुमार जैन यांच्याकडे दागिने परत करण्याची मागणी लावून धरली. त्यावेळी जैन यांनी आर्थिक अडचणीमुळे आपण दागिने एल्फिस्टन रोड येथील राजेश जैन यांच्याकडे गहाण ठेवल्याचे सांगितले. राजेश जैन यांनी आपण दागिने मोडले असल्याचे सोनी यांना सांगितले.
दागिने परत मिळण्याची शक्यता नसल्याने, तसेच ठाण्यातील सुरेशकुमार जैन आणि मुंबईतील राजेश जैन या दोघांनी आपली फसवणूक केल्याची खात्री पटल्यानंतर सुरेश सोनी यांनी मंगळवारी मानपाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. यातील सुरेशकुमार जैन यांच्यासह राजेश जैन यांनाही पोलिसांनी समक्ष बोलावून घेतले. त्यांनी १५ दिवसात सोनी यांना भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिलेली मुदत पाळली नाही. त्यामुळे दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याचे डोंबिवलीकर फिर्यादी सुरेश सोनी यांनी सांगितले. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप गोरे अधिक तपास करत आहेत.