कल्याण: कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलाने पोलीस व्हावं, असे पालकांचे स्वप्न होते. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी एका तरुणाने असे खोटे बोलले की उघडकीस आल्यावर पोलिसही अवाक् झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे
कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस शिपाई खाडे हे वाशिंद रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर होते. यादरम्यान त्यांची नजर फलाट क्रमांक दोनवर पोहोचलेल्या सीएसटी ट्रेनच्या जनरल डब्यात उभ्या असलेल्या वर्दीधारी तरुणावर पडली. खाडे यांना संशय आल्याने त्यांनी त्या तरुणाची चौकशी केली, त्यावर तरुणाने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी त्या तरुणाला ट्रेनमधून उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ट्रेन सुरू झाली होती. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने खडवली रेल्वे स्टेशनच्या पोलिसांशी संपर्क साधला. संपर्क न झाल्याने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला.
यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या रेल्वे पोलीस आणि आरपीएफ महिला जवानाच्या मदतीने तरुणाला ट्रेनमधून खाली उतरवण्यात आले.
तरूणाला ट्रेनमधून उतरवल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाची चौकशी सुरू केली. यावर तरुणाने सांगितले की, तो नाशिक जिल्ह्यातील खंबाळे, सिन्नर येथील भोकणी गावचा रहिवासी असून, तो बारावीत शिकत आहे. यानंतर चौकशीदरम्यान समोर आलेला किस्सा ऐकून पोलीसही चक्रावून गेले.
तरुणाने सांगितले की, त्याच्या आई-वडिलांची त्याला पोलीस बनण्याची इच्छा होती, त्यामुळे वर्षभरापूर्वी त्याने राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपीएफ) नोकरी मिळाल्याचे आणि प्रशिक्षण घेत असल्याचे पालकांना सांगितले होते. यानंतर तो पोलिसांची वर्दी घालून रेल्वेच्या महिला डब्यातून प्रवास करायचा, तसेच गणवेश घालून सलामीही देत असे. सध्या रेल्वे पोलिसांनी तरुणांवर कारवाई सुरू केली आहे