चेन्नई, 19 डिसेंबर : तामिळनाडूतील चार जिल्ह्यांमध्ये पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील थुथुकुडी, तिरुनेलवेली, टेंकासी आणि कन्याकुमारी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाखो लोक घरात अडकले आहेत. सुरक्षा दलांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. हे चार जिल्हे उर्वरित तामिळनाडूपासून वेगळे झाले आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी सोमवारी रात्री नवी दिल्लीत पोहोचले. राज्यपाल आरएन रवी यांनी मंगळवारी राजभवनात संरक्षण आणि केंद्र सरकारच्या विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी सकाळपर्यंत 1,039 मुलांसह 7,434 लोकांना मदत छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा बंद करावा लागला. मोबाईल टॉवर कोसळल्याने काही ठिकाणी नेटवर्क विस्कळीत झाले आहे.
राज्य सरकारने सोमवारी रात्री उशिरापर्यंत मृतांची आकडेवारी जाहीर केली नव्हती. मात्र, चार जिल्ह्यांतील हजारो एकर पिके पाण्याखाली गेली आहेत. शेकडो वाहने वाहून गेली आहेत.
थमिरबारन नदीला उधाण आले आहे. भारतीय नौदलानेही मदत आणि बचाव कार्यात सहभाग घेतला आहे. तामिळनाडू सरकारनेही लष्कर आणि हवाई दलाची मदत घेतली आहे.