ठाणे, दि. ३ : कोरोनावरील लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना तिकिट काढून लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, या नागरिकांच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर आज स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शलभ गोयल यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात येणार आहेत.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वेचा मासिक पास दिला जातो. मात्र, एका वेळच्या प्रवासासाठी लोकलचे तिकिट दिले जात नाही. त्यामुळे लाखो नागरिकांची गैरसोय होत आहे. वर्क फ्रॉम होमनुसार एखाद्या वेळी कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांबरोबरच बहुसंख्य नागरिकांना नाईलाजाने मासिक पास काढावा लागतो. त्यातून त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. यापूर्वी रेल्वे प्रशासनाने पहिल्या लाटेत सामान्य नागरिकांना तिकिटाद्वारे लोकल प्रवासाची सेवा उपलब्ध केली होती. त्याच धर्तीवर सध्या दोन डोस झालेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी तिकिटे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे. या मागणीसाठी आज रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. त्याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो प्रवाशांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून लोकल प्रवासासाठी तिकिट देण्याची मागणी केली. एक-दोन वेळा प्रवासासाठी महिनाभराचा पास काढण्याची सक्ती अन्यायकारक आहे, असे वाघुले यांनी सांगितले.