बदलापूर, दि. २३ : कोरोना काळात दुबईसह संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी अतुलनीय कार्य करून वेळीच मदत पोचविणाऱ्या बदलापूर येथील शुभांगी साकी यांना दुबईतील असामान्य महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शुभांगी साकी यांचे अभिनंदन केले आहे.

दुबईसह संयुक्त अरब अमिरातीत चाकरमानी मराठी नागरीकांची संख्या लक्षणीय आहे. कोरोना संसर्गानंतर या नागरीकांबरोबरच पर्यटनासाठी गेलेली अनेक कुटुंबे अडकली. सुमारे दोन महिन्यांनंतर परदेशातील भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ‘मिशन वंदे भारत’ विमान सेवा पुरवण्यात आली. मात्र, संयुक्त अरब अमिरातीत ये-जा करणाऱ्या विमानांची संख्या तुरळक होती. त्यावेळी शुभांगी साकी यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकार व महाराष्ट्रातील मंत्र्यांशी संपर्क साधला होता. त्याचबरोबर भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्याबरोबर दूरध्वनीवर संवाद साधून विमानांच्या फेऱ्या वाढविण्याचा आग्रह धरला. या विषयावर कपिल पाटील यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवून दूरध्वनीद्वारे विनंती केली. त्यानंतर दुबईसह संयुक्त अरब अमिरातीकडून येणाऱ्या विमान फेऱ्यांमध्ये वाढ झाली होती.
शुभांगी साकी यांनी साधारणत: मे २०२० पासून दोन महिन्यांत शेकडो महाराष्ट्रीय बांधवांना त्यांनी सुखरुपपणे घरी पाठविले. त्याआधी अडकलेल्या नागरीकांसाठी व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून अनेक ग्रूप तयार करुन संपर्क साधला. आपल्या अभियानाला ‘वंदे भारत-मिशन महाराष्ट्र’ असे नाव देऊन त्यांनी हे मिशन यशस्वीरीत्या पूर्ण केले होते.
दुबईतील सामाजिक व व्यावसायिक स्तरावर कार्यरत असलेल्या असामान्य भारतीय महिलांचा `इंडियन वूमेन इन दुबई’ या संस्थेकडून गौरव करण्यात येतो. या संस्थेने इंडियन वूमेन अवॉर्ड्स-२०२१ साठी शुभांगी साकी यांची निवड केली आहे. येत्या काही दिवसांत होणाऱ्या कार्यक्रमात श्रीमती साकी यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल. शुभांगी साकी या मूळ पुण्याच्या रहिवाशी असून, त्या २००० पासून बदलापुरात राहण्यास होत्या. सध्या त्या दुबई येथे नोकरीनिमित्ताने कार्यरत आहेत.
संयुक्त अरब अमिरातीत अडकलेल्या नागरीकांना भारतात परत पाठविण्याबरोबरच, कोरोनाच्या काळात त्यांनी मराठी नागरीकांच्या मदतीसाठी कार्य केले. अन्न, औषधे पुरवठ्याबरोबरच नागरीकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. वृद्ध व गरोदर मातांसाठी साह्य केले. तसेच नोकरी गमावलेल्या गरजू व्यक्तींना नोकरी मिळविण्यासाठी मदत केली. सध्या त्या मराठी नागरीकांबरोबरच भारतीयांना मदत करण्यासाठी आघाडीवर आहेत. संयुक्त अरब अमिरातीत किरकोळ गुन्ह्यांवरून तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीयांना मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *