सिंधुदुर्गनगरी :- “आई श्री देवी भराडी माते देशावरचं, राज्यावरचं अरिष्ट दूर कर. बळीराज्याला,सर्व सामान्यांना सुखी अणि समाधानी ठेव”, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करतानाच, कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणाही केली.
आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचे दर्शन मुख्यमंत्री शिंदे यांनी आज घेतले. यानंतर झालेल्या कार्याक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कालीदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार रविंद्र फाटक, राजन तेली आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सागरी महामार्ग हा कोकणच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचेही काम हातामध्ये घेत आहोत. रस्त्यांचे रुंदीकरण आपण करतोय, जेणेकरुन कोकणच्या पर्यटनाला चालना मिळेल. सगळे सागर किनारे हे अतिशय सुंदर आहेत. त्यांचे सुशोभिकरण करण्यात येईल. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग नागपूर-मुंबई महामार्गाच्या धर्तीवर आपण ग्रीनफिल्ड रस्ता मुंबई- सिंधुदुर्ग फास्टट्रॅक कंट्रोल याचे देखील काम हाती घेतोय. जेणेकरुन खऱ्या अर्थाने कनेक्टीव्हिटी मिळेल. तसेच प्रदूषण कमी होईल व लोकांचा वेळ वाचेल. विकासाला चालना मिळेल. विकासाची दारे खुली होतील.
कोकणामध्ये पर्यटन व मस्त्य व्यवसायालाही मोठा वाव आहे. कोकणामध्ये इतर जिल्ह्यांपेक्षा खूप पाऊस पडत असतो. परंतु, बरेचसे पाणीवाहून जाते. वाहून जाणारे पाणी शॉर्टटर्म व लाँगटर्म प्रकारचे प्रकल्प केले पाहिजेत. सिंधुदुर्गात मालवण वेंगुर्ला येथे काजू व आंबा मार्केटिंग व ब्रॅडिंग यांनादेखील चालना द्यायची आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रीयमंत्री राणे म्हणाले की, हे सरकार सामान्य जनतेचे आहे. शासनाने या यात्रेसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्याने भाविकांची मोठी सोय झाली आहे. यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांचा भगवी शाल आणि रोप देवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.