डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील  श्रावण गणपत गंगावणे  “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित 

कल्याण : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळ सहवासातील म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो असे ठाणे जिल्ह्यातील पहिले बौद्ध धर्म उपासक, जेष्ठ बौद्धाचार्य, आयुष्यमान श्रावण गणपत गंगावणे वय 90 यांचा विश्वभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जंयती महोत्सव समिती कल्याण (पू) 2017 यांच्या वतीने “जीवनगौरव” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय. यावेळी दलितमित्र अण्णासाहेब रोकडे,समितीच्या अध्यक्षा मायताई कांबळे,सामाजिक कार्यकर्ते देवानंद कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहुल हुंबरे,यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. डॉ.बाबासाहेबांच्या ह्यातीत मुंबईतील परळ न.रे.पार्क च्या जनता सभेसाठी ठाणे कोकण जिल्ह्यातून असंख्य अनुयायीना घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रखर विचारासाठी समाजाला एकत्र करण्याचे मौलिक काम त्यांनी केलं होतं.

दिवंगत सामाजिक कार्यकर्ते बी.के. भालेराव यांच्या निवासस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटी दरम्यान त्यांचे स्वीय सहायक राजभोज यांच्या सोबत कल्याण रेल्वे पोर्टर चाळीत धर्मांतर नंतर डॉ.बाबासाहेबांच्या उपस्थित बौद्ध विहाराची पायाभरणी केली.1962 च्या काळात शेतकरी कामगार पक्षाशी दोन हात करून कल्याण पश्चिमेला नगरपालिकेच्या जुन्या हॉस्पिटल शेजारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याची स्थापना करून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण केलं.बुद्ध गया येथून आणलेलं बोधिवृक्षही रोपण केलं आहे.आजही हे बोधि वृक्ष डॉ.बाबाहेबांच्या पूर्णकृती पुतळ्या शेजारी अस्तित्वात आहे. जेष्ठ बौद्धाचार्य आयु.श्रावण गणपत गंगावणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी प्रभावित होऊन बौद्ध धर्माच्या प्रसार प्रचारासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. हिंदू धर्माचा त्याग केल्या नंतर प्रत्येक ठिकाणी दलितांच्या वाड्या, वस्त्यांवर बौद्ध धर्माच्या परंपरा विधी नुसार लोकांचे परिवर्तन केलं.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे काटेकोर पणे पालन केले.पाली भाषेवर प्रभुत्व मिळवून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून असंख्य श्रामनेर शिबीर यशस्वी केले.1970 च्या काळात भदंत आनंद महाथेरो यांच्या पुढाकाराने 21 दिवस बौद्ध धर्म ग्रंथांचे सार्वजनिक वाचन पठन चा जंगी कार्यक्रम केला.यावेळी मुंबई,ठाणे,रायगड,नाशिक,पुणे,भुसावळ,जळगाव,नागपूर येथून हजारो कार्यकर्ते, बौद्ध धर्म चळवळीचे उपासक,उपासिका यांनी सहभाग घेतला होता.
रेल्वेतील उच्च पदस्थ नोकरी सांभाळून त्यांनी सामाजिक चळवळीसाठी भरीव योगदान दिलं. अनेक बेकार कार्यकर्तेना त्यांनी रेल्वेत,नगरपालिकेत नोकरी मिळवून रोजगार उपलब्ध करून दिला.पंचशीलाचे तत्व अंगिकारून त्यांनी आयुष्यभर निर्व्यसनी शाकाहारी राहून लोकांमध्येही परिवर्तन घडविले.  त्यांच्या मातोश्री दिवंगत गलासाबाई गणपत गंगावणे,त्यांचे वडिल दिवंगत गणपत विठू गंगावणे, ब्रिटिश रॉयल एअरफोर्स मध्ये वैमानिक पदावर असलेले जेष्ठ बंधू दिवंगत बाळकृष्ण गणपत गंगावणे,मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर असलेले चुलत बंधू विठ्ठल लिंबाजी गंगावणे,यांच्या प्रेरणेने त्यांना बौद्ध समाज चळवळीचे कार्य अधिक जोमाने करता आले.विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी सोबत घेऊन बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *