मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी
१६ ऑक्टोबरला श्रमजीवी संघटनेचे धरणे आंदोलन

माजी आमदार विवेक पंडित आंदोलनात उतरणार

मुंबई : मुबई महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी हॉस्पिटल आणि कूपर हॉस्पिटल येथील कंत्राटी कामगारांचे किमान वेतनासह इतर मूलभूत हक्क डावलले जात असल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी कामगार संघटनेने ऐन दिवाळीच्या तोंडावर आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. १६ ऑक्टोबर सकाळी 10 वाजल्यापासून मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.  श्रमजीवी कामगार संघटनेचे प्रमुख माजी आमदार विवेक भाऊ पंडित हे स्वतः या आंदोलनात उतरणार आहेत अशी माहिती श्रमजीवी संघटनेच्या मुंबई जिल्हाध्यक्षा नलिनी बुजड यांनी दिलीय.
कांदिवली येथील भारतरत्न डॉ आंबेडकर रूग्णालय व कूपर रूग्णालयातील सफाई व अन्य कंत्राटी कामगार हे श्रमजीवी कामगार संघटनेचे सभासद आहेत. या कामगारांच्या न्याय्य हक्काच्या मागण्यासाठी गेले सहा ते सात महिने श्रमजीवीचे पदाधिकारी आणि कामगार प्रतिनिधी सातत्याने निवेदन, आंदोलन अशा विविध मार्गाने पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अन्य कायदेशीर लाभही अजून पर्यंत दिले गेलेले नाहीत असेही बुजड यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. एनजीओ या नावाने स्वयंसेवक कामगार असा अजब फॉर्म्युला वापरून महापालिकेचे काही अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने मोठा घोटाळा करून कामगारांचे शोषण करत असल्याचा आरोपही संघटनेने प्रसिध्दी केलेल्या पत्रकात केलाय.दररोज प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांची हॉस्पिटल प्रशासन,महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडून पिळवणूक आणि शोषण निषेधार्थ आहे. प्रशासनाने कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी पत्रकात दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!