डोंबिवली : शूटिंग हा खेळ भारतात प्रचंड वेगाने वाढत असून ऑलिम्पिकसह विविध जागतिक स्पर्धांमध्ये भारताने अनेक पदके मिळवली आहेत. शारीरिक स्थैर्य, मनाची एकाग्रता, निशाणा अचूक वेध घेण्याचे कौशल्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ध्येय गाठण्याची ऊर्जा या खेळामुळे मिळत असल्याचे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार विजेती ख्यातनाम शुटर आणि माजी ऑलिम्पियन सुमा शिरूर यांनी केले. डोंबिवलीतील पेंढरकर महाविद्यालयात सुमा शिरूर यांच्या शूटिंग अकादमीचा कल्याण प्रांताधिकारी अभिजित भांडे यांच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ झाला. अझरबैजान येथील जागतिक स्पर्धेत सहभागी असल्याने शिरूर यांनी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाल्या होत्या.
पेंढरकर महाविद्यालयात अत्याधुनिक इनडोअर शूटिंग रेंज विकसित करण्याचे कारण की डोंबिवली विशेषतः ग्रामीण परिसरातून शूटिंग क्रीडा प्रकारातून सुवर्णपदक विजेते खेळाडू घडवणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्याचे शिरूर यांनी प्रतिपादन केले. या प्रसंगी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई, विश्वस्त आनंद आचार्य, उमेश पटवारी, लक्ष्य अकादमीचे सिद्धार्थ शिरूर उपस्थित होते.
आपल्या बौद्धिक हुशारीच्या जोरावर डोंबिवली परिसरातील अनेक जण यशस्वी झाले असून मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहेत. जागतिक दर्जाची शुटिंग रेंज उपलब्ध केल्यास या परिसरातून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील म्हणून सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली परिसरातून शूटिंग स्टार्स तयार करण्याचे ध्येय अकादमीच्या माध्यमातून ठेवण्यात आल्याची माहिती डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांनी दिली.
इनडोअर शूटिंग रेंजमध्ये जागतिक शूटिंग संघटनेतर्फे मान्यताप्राप्त जर्मन बनावटीच्या एयर रायफल्स व पिस्तुले व अन्य जागतिक दर्जाची उपकरणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. क्रीडापटूंना सरावासाठी दहा मीटर रेंजच्या एकूण आठ लेन्ससह डिजिटल टार्गेट्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शूटिंग वैयक्तिक तसेच सांघिक खेळ असून दहा वर्षावरील वयोगटातील व्यक्ती हौशी किंवा व्यावसायिक शुटर होण्यास पात्र आहेत अशी माहिती लक्ष्य शूटिंग क्लबचे सिद्धार्थ शिरूर यांनी दिली.