ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात एक धक्कादायक प्रकरण घडलं आहे. एका तरूणाने प्रेयसीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही तरूणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपी तरूण अश्वजीत गायकवाड हा एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा आहे या तरूणीने इन्स्टाग्रामवर हा प्रकार टाकल्यानंतर उजेडात आला आहे. या प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
प्रिया सिंह असं या जखमी तरुणीचं नाव आहे. अश्वजित गायकवाड असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे. अश्वजितनंच कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये केला आहे. तसेच त्याचे मित्र रोमील पाटील, आणि सागर शेळकेे यांनीही जबर मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे. इन्स्टाग्रामवरील पोस्टच्या माध्यमातून प्रिया सिंहने या संपूर्ण घटनेचं भयावह वर्णन केलं आहे.
याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 279, 338, 323, 504, 34 अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. “मी चार दिवसांपूर्वीच एफआयआर केला होता. पण कोणी यायला तयार नव्हतं, ते विलंब करत होते. पण आज मी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यामुळं आज पोलीस सहकार्य करत आहेत,” असे प्रिया सिंह हिने म्हटले आहे.
https://www.instagram.com/priyasingh_official?igshid=YTQwZjQ0NmI0OA==