मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार आहे. यावेळी एक पक्ष, एक नेता, एक विचार, एकच मैदान; “शिवतीर्थ” असं ठाकरे गटाकडून ट्विट करत टिझर रिलीज करण्यात आला आहे.
शिवसेना पक्ष फुटीनंतर यावर्षीही शिवसेनेच्या दोन्ही गटाचे वेगवेगळे दसरा मेळावा होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळावं, यासाठी दोन्ही गटाने मुंबई महापालिकेकडे अर्ज केले होते. मात्र यामधून शिंदे गटाने माघार घेतल्याने मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला शिवतीर्थावर मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टिझर जारी केला आहे.
दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला शिवतीर्थ मैदानासाठी परवानगी दिल्यानंतर ठाकरे गटाकडून आता टिझर जारी केला आहे. यामध्ये एक पक्ष,एक नेता आणि एक विचार असं म्हणत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटोंचा समावेश आहे. यामध्ये शिवसेना पक्षाचा वाघाचा फोटो देखील व्हिडीओत दाखवण्यात आला आहे.
शिवसेनेचा दरवर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा होत आहे. परंतु मागच्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडाळी केल्याने शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर ठाकरे गटाचा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा बीकेसीवर दसरा मेळावा पार पडला होता. मैदान मिळवण्यासाठी दोन्ही गटामध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली होती. परंतु मुंबई पालिकेने मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही ठाकरे गटाला परवानगी दिली आहे.