बाळासाहेबांच्या निष्ठावंत सैनिकाला आता तरी आमदार बनवा…

शिवसेनेत पदाच्या लालसेपोटी अनेक आले, गेले,  सुभाष महाजन ४० वर्षे शिवसैनिकच ! 

मुंबई : आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो,  या उद्दात हेतूने अनेकजण काम करीत असतात त्यातीलच एक नाव म्हणजे डोंबिवलीतील ज्येष्ठ समाजसेवक सुभाष महाजन !  कपाळाला टीळा अंगावर सफारी आणि चेह-यावर नेहमी हास्य, कोणालाही लागेल ती मदत करायला तत्पर असं हे व्यक्तीमत्व. स्टेट बँकेत नोकरी करणारे महाजन कट्टर शिवसैनिकच. कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगत १०- १५ नव्हे तर तब्बल ४० वर्षे सामाजिक सेवेत काम करीत आहेत. शिवसेनेत पदाच्या लालसेपोटी अनेकजण आले आणि गेलेही.. मोठ मोठी पद भूषवली. पण महाजन हे गेली ४० वर्षे शिवसैनिकच. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला.  बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले, उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी झटणा-या व कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगणा-या  निष्ठावंत सुभाष महाजन यांना  आता तरी न्याय मिळेल का ? असाच खरा प्रश्न आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन १९७९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हे ब्रीद उराशी बाळगून महाजन हे गेली ४० वर्षे सातत्याने काम करीत आहेत. शिवसेनेचे कोणतंही पद  नसतानाही केवळ शिवसैनिक म्हणून त्यांनी अनेकांची कामे केली आणि अजूनही करीत आहेत. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे सलाेख्याचे संबध. बाळासाहेबांशी त्यांचे थेट संबध होते. त्यांच्या कार्याचा गौरव बाळासाहेबांनी अनेकवेळा भाषणातून केला. पण त्यांनी स्वत:साठी कधीच पदाची मागणी केली नाही. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेेचे व्रत कायम ठेवले. सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारीता, कला, क्रिडा सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या चौफेर कामाची चुणूक दाखवली. डझनभर संस्थेच्या माध्यमातून ते काम करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत विविध संस्थांकडून, शासनाकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची मुदत ६ जून रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्यपालांकडून कला, साहित्य, विज्ञान, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान  देणा-या सदस्यांची निवड विधानपरिषदेत आमदार म्हणून केली जाते. महाजन हे अनेक वर्षापासून राज्यपाल कोटयातील आमदारकीसाठी इच्छूक आहेत. पण त्यांना संधी मिळू शकली नाही.  कला, क्रिडा, सांस्कृतीक, सामाजिक, शैक्षणिक, कामगार  पत्रकार आदी विविध क्षेत्रात कार्यरत असणारे आणि   तब्बल चाळीस वर्षे एकनिष्ठतेने कोणतेही पद न मिळताही शिवसेनेशी  प्रामाणिक असणारे  निष्ठावंत  सुभाष महाजन यांची  राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती करावी अशी लेखी मागणी विविध संघटनांकडून शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे महाजन यांच्या नावाचा आता तरी विचार करून निष्ठावंत शिवसैनिकाला न्याय द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
——–
2 thoughts on “बाळासाहेबांच्या निष्ठावंत सैनिकाला आता तरी आमदार बनवा…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!