सेनेच्या एका चुकीने, विजय हिरावलाच, पण ठाकरे बंधूमध्ये वितुष्टही वाढलं !
मुंबई : ( संतोष गायकवाड ) : राजकारणात कोणताही निर्णय लगेच घेतला गेला नाही तर अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. त्याचाच प्रत्यय भांडूपच्या पोटनिवडणुकीनंतर शिवसेनेला आलाय. भाजपमधून निवडून आलेल्या जागृती पाटील या पहिल्यांदा उमेदवारीसाठी शिवसेनेकडे अॅप्रोच झाल्या होत्या. पण सेना नेत्यांचे अंर्तगत हेवेदावे आणि कुरबुरीमुळे त्यांना नाकारले गेल्याची खात्रीलायक माहिती उजेडात येत आहे. त्यामुळे सेनेचा हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. आणि त्यानंतर फोडाफोडीचं राजकारण खेळण्याची वेळ शिवसेनेवर आली. सेनेच्या  एका चुकीमुळे  विजय हिरावलाच, पण ठाकरेबंधूमध्ये वितुष्ट निर्माण झालय.
काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या भांडूपच्या प्रभाग क्र ११६ मधून त्यांच्या सून जागृती पाटील या भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. डोंबिवलीचे माहेर असलेल्या जागृती पाटील यांचे वडील वामन म्हा़त्रे हे २५ वर्षे सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. जागृती यांना लहानपणापासून सेनेचे बाळकडू मिळाले असल्याने त्यांचा पहिला अॅप्रोच हा शिवसेनेकडेच होता. मात्र सेना नेत्यांच्या अंतर्गत हेवेदावे आणि कुरबुरीमुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही. अखेरीस नाईलाजस्तव त्यांना भाजपची वाट धरावी लागली. शिवसेनेत येण्यासाठी अनेकजण इच्छूक असतात मात्र सेना नेत्यांच्या हवेदाव्यांमुळे ते त्यांना भाजपकडे लोटत असल्याचेच यातून दिसून आलय.

असा घडला घटनाक्रम.. 

जागृती पाटील त्यांचे पती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहाययक मिलींद नार्वेकर यांच्या संपर्कात होते. पण शिवसेनेचे नेते लिलाधर डाके, शिवसेना आमदार अशोक पाटील आणि विनायक राऊत यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध दर्शविला. त्याठिकाणाहून शिवसेनेचे आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मिनीश्री पाटील या इच्छूक होत्या. पण दुसरीकडे सेनेचे दत्ता दळवी, स्थायी समितीचे सभापती रमेश कोरगावकर आणि सुनील राऊत यांनी मिनाश्री पाटील यांना उमेदवारी न देता तिथला स्थानिक महिला आघाडी प्रमुखाला उमेदवारी द्यावी असे मत मांडले होते. अन्यथा जागृती पाटील यांना उमेदवारी द्या असे मातोश्रीवर सांगितल्याचे समजते. हे प्रकरण उध्दव ठाकरेंकडे गेले. पण आपआपसात हेवेदावे नको म्हणून जागृती पाटील यांना सेनेकडून नकार कळविण्यात आला. त्यानंतर पाटील या भाजपचे गटनेता मनोज कोटक यांच्यामाध्यमातून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे अॅप्रोच झाल्या. सासूची सहानुभूती आणि भाजपची व्होट बँक या सगळयाचा विचार करून भाजपने क्षणाचा विलंब न लावता जागृती पाटील यांना उमेदवारी दिली. आणि त्या विजयी झाल्या. निवडणुका नुसत्या जिंकल्या जात नाहीत. त्यासाठी कार्यकत्यांना आर्थिक रसदही पुरवावी लागते. अखेर शेवटचे दोन दिवस शिल्लक असतानाच मातोश्रीवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना भांडूपमध्ये पाठवण्यात आले त्यांनी आर्थिक रसदही पुरवल्याचे समजते पण तोपर्यंत वेळ गेली हेाती.

तर महाभारत घडल नसत
जागृती पाटील यांच्या हातावर वेळीच शिवबंधन बांधले गेले असते तर कदाचित किरीट सोमययांनी शिवसेनेला आव्हान दिलं नसत. आणि मनसेच्या सहा नगरसेवकांना गळाला लावण्याची वेळ सेनेवर आली नसती. आणि भावाभावांमध्ये वितुष्ट निर्माण झालं नसत. व पुढील महाभारत सेनेला टाळता आलं असत. पण सेनानेत्यांच्या अंतर्गत हेवेदावे आणि कुरबुरीमुळे सेनेला हा सामना करावा लागत असल्याचेच स्पष्ट होतय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *