मुंबई : भाजपाचे वॉशिंग मशीन पुन्हा एकदा कामाला लागले आहे. शिवसेना उबाठा गटातील नेते आमदार रवींद्र वायकरांनी पंचतारांकित हॉटेल बांधताना 500 कोटींचा घोटाळा केला असा आरोप किरीट सोमय्यांनी करताच पालिकेनेही त्यांना नोटीस बजावली होती. पण वायकरांनी भाजपाशी मैत्री असलेल्या शिंदे गटात जाण्याचे मान्य करताच वायकरांच्या निवेदनावर आम्ही विचार करू, असे निवेदन आज पालिकेने न्यायालयात दिले आणि वायकरांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून बेदाग करण्याची प्रक्रिया सुरू केली.
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड लगतच्या वेरावली गावात खेळाच्या मैदानासाठी राखीव असलेला भूखंड पालिकेची दिशाभूल करून वायकर यांनी स्वतःच्या ताब्यात घेतला. या भूखंडावर 500 कोटी रुपये खर्च करून पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येत आहे, असा आरोप करीत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून प्रथम मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. पुढे हे प्रकरण अंमलबजावणी संचलनालयाकडे (ईडी) वर्ग करण्यात आले. ईडीने वायकर यांच्या विरोधात मनी लाँडरिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. तेव्हापासून वायकर हे ईडीच्या रडारवर आले आहेत.
या प्रकरणीच्या तपासादरम्यान 11 जानेवारी 2024 रोजी ईडीने वायकर यांचे निवासस्थान आणि त्यांच्याशी संबंधित सहा ठिकाणी एकाच वेळी छापे घातले होते. त्या छाप्यांमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या कागदपत्रांची छाननी करून ईडीने त्यांना 29 जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावले होते.त्यावेळी वायकर चौकशीला हजर राहिले. ईडीच्या कार्यालयात त्यांची सलग नऊ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर ईडीने त्यांना दुसऱ्यांदा समन्स पाठविले. मात्र ईडीच्या दुसऱ्या समन्सला ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे वायकरांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार राहिली. अखेर वायकरांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. आपला हा निर्णय त्यांनी निवडक पदाधिकाऱ्यांसमोर बोलून दाखविला आहे. ईडीची चौकशी टाळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते अमित शहा यांना फोन करण्याची विनंती आपण उद्धव ठाकरे यांना केली, पण आपण असे काही करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले. त्यामुळे आता शिंदे गटात जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. अटक करून तुरुंगात डांबले तर आपण एक दिवसही जिवंत राहू शकत नाही. कारण आपल्या हृदयात पाच-पाच स्टेंट टाकलेले आहेत, असे वायकर कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले होते. वायकर उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार अशी चर्चा जोगेश्वरीमध्ये तेव्हापासूनच सुरू झाली आहे.आज अचानक मुंबई महानगर पालिकेने कोलांटउडी मारत वायकर यांच्या प्रस्तावावर पुन्हा विचार करू असे निवेदन मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिल्याने भाजपाच्या वॉशिंग मशीनच्या दिशेने वायकर यांचा प्रवास सुरू झाला आहे हेच स्पष्ट झाले.