दिवाळी सणाला गालबोट लावण्याचे काम उबाठा गटाकडून होत असल्याचा आरोप !

सोलापूर : मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात केवळ अडीच दिवस मंत्रालयात उपस्थिती दर्शवली हा विश्वविक्रम उद्धव ठाकरे यांनी केला. सत्तेवर असताना त्यांना शिवसेना शाखा व कार्यकर्ता दिसला नाही. आज मुंब्रा शाखेला भेट द्यायला निघालेत मात्र आज उशीर झाला आहे. वेळीच हे काम केलं असतं तर आज घर का ना घाट का अशी स्थिती झाली नसती असा टोला  शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी केली.

         ठाणे येथील शिवसेनेच्या मुंब्रा शाखेला भेट देण्यासाठी  उद्धव ठाकरे हे जात आहेत. त्या संदर्भात यावेळी पत्रकार परिषदेत प्रा. वाघमारे यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे, अशा परिस्थितीत राजकीय चिखल फेकीचे वातावरण महाराष्ट्रात निर्माण केले गेले आहे. अत्यंत दुर्दैवी हा प्रकार आहे. 

     यावेळी प्रा ज्योती वाघमारे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे व आदित्य ठाकरे यांना विविध प्रश्न उपस्थित केले. हिंदू धर्माचे सण उत्सव आल्यानंतरच उद्धव ठाकरे यांना ही नाटकं का सुचतात ? हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार आणि तत्वांना बुलडोझर लावून उद्धव ठाकरे यांनी सत्ता मिळवली. कदाचित हे निसर्गालाही पटलेले नसावे. त्यामुळेच ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसल्यानंतर कोरोनासारखे जागतिक संकट आले. अनेक सण उत्सवावर निर्बंध लागले  होते आणि आता निर्बंध मुक्त सण उत्सव साजरे होत आहेत. आज दिवाळी सारखा अत्यंत मोठा सण होताना दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी होऊ नये असे उद्धव ठाकरे यांना वाटते का ? राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनता चार पैसे गाठीला बांधून सणा दिवशी कपडे घेतात किंवा गरिबांच्या झोपडीतही पणती लावून आनंद साजरा करतात. अशा दिवाळीच्या सणात प्रकाशाच्या उत्सवाला गालबोट लावण्याचे काम उबाठा गटाकडून होत आहे याचा असे असा आरोप करत  या प्रकाराचा प्रा. वाघमारे यांनी निषेध केला. प्रत्येक वेळी हिंदूंच्या सण उत्सवाला गालबोट लावण्याचे काम ते का करतात असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

      उद्धव ठाकरे हे मुंब्रा शाखेला भेट देत असल्याच्या विषयी बोलताना प्रा. वाघमारे पुढे म्हणाल्या,  मुंब्रा शाखा ही धर्मवीर आनंद दिघे यांनी घेतली होती. त्या शाखेचे जे प्रमुख आहेत, त्यांचे वय 75 वर्षापेक्षा अधिक आहे. ते जगताप हे शिवसेना शिंदे गटासोबत आहेत. ही शाखा शिवसेनेच्या आत्मा आहे. हिंदु हृदय सम्राट  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की शाखेमध्ये सेनेची आन-बान – शान आहे. त्या मुंब्रा शाखेत अनेक वर्ष समाजकारण आणि सेवा घडायचे. मात्र आज तिथे उबाठा गटाचे काही लोक बिल्डिंग मटेरियलचा धंदा थाटून बसले होते. शाखा भाड्याने दिली होती. शाखा भाड्याने देणे हे आईच दूध विकून खाण्याचा प्रकार आहे. तुम्ही तुमचा पक्ष शरद पवार यांना भाड्याने दिला. मुंबई महापालिका कॉन्ट्रॅक्टरला भाड्याने दिली. तुमचं सरकार काँग्रेसला भाड्याने दिले आणि अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी भाड्याने देऊन जगण्याचे राजकारण तुम्ही करत आहात. असा घणाघाती आरोप करत ही अतिशय घृणास्पद गोष्ट आहे, असेही त्या म्हणाल्या.

     तर दुसऱ्या बाजूला आमदार जितेंद्र आव्हाड, खा. संजय राऊत हे यापूर्वी जातीय दंगली घडविण्याची भाषा करीत होते. दरम्यान, ठाण्यात ड्रग्जप्रकरणी  येथील कोविड झालेल्या एका नेत्याच्या तपासणीत ड्रग आढळून आले. या संदर्भात लवकरच भूमिका स्पष्ट होणार आहे. असेही प्रा. वाघमारे यांनी स्पष्ट केले.

       सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सामाजिक धार्मिक समता धोक्यात आणून महाराष्ट्रात राजकारणाची पोळी भाजणार आहात का असा सवाल उपस्थित केला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अडीच वर्षात केवळ अडीच दिवस मंत्रालयात गेले होते. खुद्द शरद पवार यांनीच तसे त्यांच्या पुस्तकात नमूद केल्याचेही वाघमारे म्हणाल्या. सत्तेवर असताना ठाकरे यांना शाखा व कार्यकर्ता दिसला नाही. आज उशीर झाला यापूर्वीच शाखा भेटी केल्या असत्या तर आज घर का ना घाट का अशी स्थिती झाली नसती असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

संजय राऊतांना भविष्य सांगण्याचे काम उरलय

31 डिसेंबर नंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार का  यावर खासदार राऊत यांनी भाष्य केले आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात प्रा. वाघमारे म्हणाल्या की खासदार संजय राऊत यांनी आता पिंजरा व पोपट घेऊन सगळ्यांचे भविष्य सांगत बसावे. तेवढेच काम आता त्यांना उरले आहे. वास्तविक पाहता त्यांनी स्वतःच्या भविष्याची चिंता करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!