शिवसैनिकांमध्ये अंगार पेटविण्यासाठी आता व्याघ्र मूठ 

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वाघांना अंगठीचे वाटप

मुंबई – शिवसेनेने शिवबंधनाच्या माध्यमातून लाखो शिवसैनिकांच्या मनगटात बळ आले होते. आता शिवसैनिकांमध्ये अंगार पेटविण्यासाठी, स्फुल्लिंग चेतवण्यासाठी वज्र नव्हे व्याघ्रमूठ तयार करण्यात आली आहे. शिवबंधनानंतर शिवसैनिकांसाठी वाघाची अंगठी तयार करण्यात आली असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना कुलाबा विधानसभेचे समन्वयक कृष्णा पवळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या वाघ अंगठीचे शिवसेनेच्या 88 वाघांना आज वाटप करण्यात आले.

गेली 50 वर्षे शिवसेनेचा वाघ हा शिवसैनिकांचा सोबती म्हणूनच वावरतोय. कार्यक्रम कोणताही असो, मग ती निवडणूक असो किंवा आंदोलने असो, शिवसेनेच्या प्रत्येक घोषवाक्यात वाघ हा असतोच. त्यामुळे कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला… ही घोषणा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून आहे. खरं सांगायचं तर शिवसेनेचा वाघ हा शिवसेनेचे स्फूर्तीचिन्हच आहे. ते स्फूर्तीचिन्ह प्रत्येक शिवसैनिकांच्या मुठीत बळ देणारे ठरत आलेय. हेच डोळ्यासमोर ठेऊन कृष्णा पवळे या शिवसैनिकाने पुढाकार घेऊन आपल्या वाघाची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ही अनोखी व्याघ्र अंगठी तयार केली आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या हस्ते शिवसेनेच्या 88 वाघांना या अंगठीचे वाटप करण्यात आले. या वाघ अंगठीच्या प्रेमात सारेच सैनिक पडल्यामुळे भविष्यात या अंगठीची सैनिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी जोर धरेल, असा विश्वास या अंगठीची संकल्पना साकारणाऱया कृष्णा पवळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवबंधनाबरोबर ही वाघ अंगठीही शिवसैनिकांच्या हातात दिसू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *