मुंबई : अभ्युदय नगर, आदर्श नगर, वांद्रे रेक्लमेशन पूनर्विकास प्रकल्प अदाणी समूहाला देण्याचा राज्य सरकारचा हट्ट आहे. त्याविरोधात शिवसेना ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दंड थोपटले आहे. मराठी माणसाच्या बलिदानातून मिळवलेली मुंबई आम्ही कोणाला आंदण देऊ देणार नाही. त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी आणि अदाणी समूहाला स्पष्टीकरण विचारण्यासाठी येत्या १६ डिसेंबरला दुपारी ३ वाजता शिवसेनेचा (ठाकरे) प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा मोर्चा धारावीतून अदाणींच्या कार्यालयावर जाईल. दमदाटी दादागिरी करून धारावीकरांना हद्दपार करण्याचा प्रयत्न करू नका. कोणावरही अशा प्रकारे अन्याय अत्याचार झाल्याचा प्रयत्न झाल्या, मर्द शिवसैनिक गुंडांना सरळ करतील, असा इशारा ठाकरे यांनी यावेळी दिला.
मंत्रालयासमोरील नुतनीकरण केलेल्या शिवसेनेच्या (ठाकरे) शिवालय या कार्यालयाचे ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेतली. ठाकरे म्हणाले की, पूर्वी एक म्हण होती, ‘सारी भूमी गोपाल की’, त्यानुसार ‘सारी मुंबई अदाणी की’ असा कारभार चालला आहे. अनेक ठिकाणी पुनर्विकास करताना, लोकांना ४०० ते ५०० चौरस फूटांची घरे दिली जातात. परंतु, धारावीकरांना ३०० चौरस फूटांची घरं देऊ असे सांगितले जात आहे. परंतु, धारावीकरांनाही ४०० ते ५०० चौरस फुटांची घरे मिळायला हवीत असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे नुकसान झाले आहे त्यावरूनही ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राज्यातील शेतकरी हातबल झाला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटी यामुळे तो कोलमडून पडला आहे. या बळीराजाला, शेतकऱ्याला मदत करणे हे सरकारचे काम आहे. पण सरकारकडून अजून कोणतीही शेतकऱ्यांसाठी मदत होत नाही, हे दुर्दैवी आहे. निवडणूक आणि प्रचारामध्ये राज्य सरकार व्यस्त होते. बळीराजा संकटात असताना सरकार आहे कुठे? असा सवाल ठाकरे यांनी यावेळी उपस्थित करत सरकारला धारेवर धरले.
पाच राज्यांच्या निवडणुक निकालात भाजपला चांगले यश मिळाल्याने त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, भाजपचे मी अभिनंदन करतो, लोकशाही टिकली पाहिजे. लोकशाही पद्धतीने ते निवडून आलेत हे बरोबर आहे. देशभरात सगळीकडे विरोधात वातावरण आहे. एक्झिट पोल आणि उलटेपालटे करणारे निकाल लागत आहेत. मग, हे कसे घडले, हा प्रश्न मतदारांना पडत असेल. अनेकजण ईव्हीएम मशीनबाबत शंका व्यक्त करत आहेत. त्यामुळे ईव्हीएमचा हा घोळ कायमस्वरूपी सुटला पाहिजे. ही शंका दूर करण्यासाठी हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूका जिंकून दाखवा असे थेट आव्हान ठाकरे यांनी भाजपला दिले.
कर्नाटकात बजरंग बलीच्या नावाने पंतप्रधानांनी मते मागतली. मध्यप्रदेशात रामलल्लाचे फुकट दर्शन घडवण्याचे आश्वासन अमित शहा यांनी दिली. मात्र निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भाषणात हिंदुत्वाचा आणि राम मंदिराचा मुद्दा घेतला तर त्यांच्यावर सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली. तसेच बाळासाहेंबासह शिवसेनेच्या काही आमदारांचा मतदानाचा अधिकार निवडणूक आयोगाने काढून घेतला होता. ठाकरेंनी याची आठवण करून देताना निवडणूक प्रचारात देवा, धर्माच्या नावाने मते मागितली तर तो गुन्हा होतो का? असा सवाल पत्राद्वारे निवडणूक आयोगाला केला असून त्यावर अद्याप उत्तर आलेले नाही. अजून एक महिना वाट बघणार, जर निवडणूक आयोगाचे उत्तर आले नाही. तर देवा-धर्माच्या नावाने मते मागायला तुमची काहीच हरकत नाही, तुमची मान्यता आहे, असे असा अर्थ मानून आगामी निवडणुकीत ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करून प्रचार करू. हिंदुत्वाचे प्रश्न उघडपणे मांडू, त्यावेळी तुम्ही आमच्यावर कारवाई करता कामा नये, असा इशारा ठाकरेंनी आयोगाला दिला.