डोंबिवली, दि.23 ; राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर आता कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकामाविरोधात शिवसेनेने दंड थोपटले आहे. शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी बेकायदा बांधकामावर तातडीने कारवाई करून नागरिकांची फसवणूक थांबवावी अशी मागणी महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
कल्याण डोंबिवलीत भूमाफियांनी सरकारी जागेवर, आरक्षित भूखंडावर टोलेजंग इमारती उभारल्याचा धडका सुरू आहे. कोरोना काळात प्रशासकीय यंत्रणा नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी काम करीत होती. मात्र त्याचाच फायदा उठवीत भूमाफियांकडून बेकायदा बांधकामे उभारण्याचा सपाटा सुरू होता.. पालिका प्रशासनाकडून बेकायदा बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी अवघ्या सहा ते आठ महिन्यात इमारती उभ्या करून तातडीने विक्री केल्या जात आहेत. मात्र पालिका कारवाई करण्यासाठी आल्यानंतर रहिवाशांच्या निवा-याचा प्रश्न पुढे करून कारवाई करू नये यासाठी भूमाफियांकडून प्रयत्न केले जातात. नागरिक आयुष्याची पुंजी लावतात. मात्र यापुढे त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रशासनाकडून बेकायदा बांधकामावर तातडीने कारवाई करण्यात यावी याकडं भाऊसाहेब चौधरी यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधलं आहे. तसेच बेकायदा इमारतींना महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा आणि पालिकेकडून नळजोडणी का केली जाते असाही सवाल भाऊसाहेब चौधरी आणि विभागप्रमुख अमोल पाटील यांनी निवेदनाद्वारे केला आहे.