डोंबिवली दि. 29 जुलै : :सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनता पुरामुळे हैराण झालेली आहे, मात्र विरोधकांकडून याचेही राजकारण सुरू आहे या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत लावण्यात आलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. डोंबिवली पूर्वेला इंदिरा चौकात डोंबिवली शहर शिवसेना शाखेतर्फे हा बॅनर लावण्यात आला असून त्यातुन विरोधी पक्षावर निशाणा साधण्यात आला आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूराने हाहाकार माजवत अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. सध्याच्या घडीला कोसळलेले हे संसार पुन्हा सावरण्याची खरी गरज असताना त्यांना केल्या जाणाऱ्या मदतीवरून राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत लागलेले हे बॅनर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. या बॅनरमध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो वापरण्यात आला असून ” मला जीव वाचवायचे आहेत, राजकारण करायचे नाही. जे घाणेरडे राजकारण करत आहेत ते त्यांना करू द्या. मला राजकारण करायचे नाही. सत्ता येते आणि जाते.. पण जीव गेला तर परत येत नाहीत.” अशा आशयाचा मजकूर त्यावर लिहिण्यात आला आहे.
यासंदर्भात बोलताना शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले की, 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे पूर्वीपासूनच शिवसेनेचे ब्रीदवाक्य आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर उद्धव ठाकरे हे या ब्रीदवाक्याला अनुसरूनच काम करत आहेत. तरीही विरोधक अशा परिस्थितीत घाणेरडे राजकारण करत आहेत. ही राजकारण करायची नाही तर सर्वांनी एकत्र मिळून लोकांचे अश्रू पुसण्याची वेळ असल्याचे मोरे यांनी सांगितले.