पुणे – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ३० आमदारांच्या एका गटाने शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने राष्ट्रवादीला खिंडार पडलं आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पवार म्हणाले की, १९८० ला जे चित्र दिसले ते चित्र पुन्हा महाराष्ट्रात जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल हा माझा एककलमी कार्यक्रम राहिल. मला महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर विशेषतः तरुण पिढीवर प्रचंड विश्वास आहे. जे घडलं त्याची मला चिंता नाही. पक्ष फुटला असे मी कधीच म्हणणार नाही. आम्ही न्यायालयात जाणार नाही, जनतेत जाणार आहोत. उद्या सकाळी कराडला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन साताऱ्यात दलित समाजातील घटकांचा पहिला मेळावा घेणार. त्यानंतर राज्यात आणि देशात जावून लोकांशी जास्तीत जास्त संपर्क वाढविण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल, ही माझी नीती राहील असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेत पक्षाची वाटचाल कशी असणार ही भूमिका मांडली. पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न असेल तर आजचा प्रकार हा इतरांना नवीन असेल मला नवीन नाही असे स्पष्ट सांगतानाच शरद पवार यांनी १९८० साली निवडणूकीनंतर मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. आणि एक महिन्यानंतर त्या ५८ पैकी ६ सोडले तर सगळे मला पक्षाला सोडून गेले. त्या ५८ जणांचा विरोधी पक्षनेता होतो त्याऐवजी मी पाचच लोकांचा नेता झालो. पाच लोकांना घेऊन पुन्हा पक्ष बांधायला महाराष्ट्रात बाहेर पडलो. माझा उद्देश होता की पुन्हा पक्षाची बांधणी करायची आणि पाच वर्षांने निवडणूक झाली त्या निवडणुकीत आमची संख्या ६९ वर गेली. म्हणजे संख्या वाढली. पाच जणांचा नेता असतानाही संख्या वाढली. नुसतीच वाढली नाही तर जे पक्ष सोडून गेले त्यापैकी चार सोडले तर सगळे पराभूत झाले ही आठवण आणि घडलेला प्रसंगही शरद पवार यांनी सांगत पक्षाची रणनीती काय असणार हे स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर ७० हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला हेाता, त्याच भाषणाचा दाखला देत पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये असताना जलसंपदा विभागात घोटाळा झाल्याचा आरोप पंतप्रधान मोदींना केला होता. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आज शपथ घेतली. मला आनंद आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांना शपथ दिली. याचा अर्थ असा की पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आरोप हे वास्तव नव्हते. त्या सगळ्या आरोपातून पक्षाला, ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांना मुक्त केले. त्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे, असा टोला शरद पवारांनी लगावला.

६ जुलैला मी पक्षाच्या प्रमुख लोकांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत संघटनात्मक बदल करण्याचे जे प्रश्न उपस्थित केले गेले होते त्याचा विचार करणार होतो. जे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्यापूर्वीच काही लोकांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली. ती भूमिका घेऊन आम्हीच पक्ष आहोत हे मांडले. पक्षाच्या विधीमंडळ सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली यासंबंधीचे चित्र आणखी दोन – तीन दिवसात लोकांसमोर येईल. त्याचे कारण ज्यांची नावे आली त्यातील काही लोकांनी आज माझ्याशी संपर्क साधला आणि आम्हाला यातील काही कल्पना नाही. आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे ती कायम आहे. याचा खुलासा माझ्याकडे केला आहे. यावर मी आताच काय बोलू इच्छित नाही याचे स्वच्छ चित्र माझ्या इतकंच जनतेसमोर मांडण्याची आवश्यकता आहे. ते जर त्यांनी मांडले तर त्यावर माझा विश्वास बसेल आणि मांडले नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेन असेही शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *