मुंबई: कर्नाटकामध्ये काँग्रेस पक्षाची विजयाच्या दिशेने सुरु असलेल्या वाटचालीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘सत्तेचा गैरवापर केल्यामुळे कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव होईल.’, असे मत पवार यांनी व्यक्त केले आहे. २०२४ च्या निवडणुकीत काय चित्र असेल? याचा अंदाज यातून लावू शकतो. कर्नाटकचे चित्र देशभर दिसेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

शरद पवारांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. कर्नाटकच्या जनतेने भाजपला स्पष्टपणे नाकारले आहे. मोदी-शहांनी सभा घेऊनसुद्धा तिथल्या जनतेचा भाजपवर रोष व्यक्त होईल अशी खात्री होती. ‘फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना मान्य नाही हे आज स्पष्ट झाले. आज झालेले मतदान यश-अपयश समजू शकतो. कर्नाटकमध्ये भाजपकडे ६५ जागा तर काँग्रेस १३३ जागांवर आघाडीवर आहे. भाजपपेक्षा काँग्रेस दुप्पट जागेवर आघाडीवर आहे. भाजपचा सपशेल पराभव जनतेने केलाय. त्याची मुख्य कारणं सत्तेचा आणि साधनांचा गैरवापर ही आहे असे पवार म्हणाले.

‘केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये नाही. पंजाब आणि दिल्लीमध्ये नाही. याचाच अर्थ बहुसंख्य राज्यात भाजप सत्तेबाहेर जात आहे. धर्म, जातीचा एकदा वापर केला. त्याचा एकदाच फायदा होईल. बजरंगबली विषय काढण्याची गरज नव्हती. फोडाफोडीचे राजकारण कोणी करत असेल तर धडा शिकवला पाहिजे.’, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले.फोडाफोडीला संधी मिळू नये याची खबरदारी कर्नाटकातील जनतेने घेतली आहे. त्यामुळे ऑपरेशन कमळची शक्यता कमी आहे, असंही पवारांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *