मुंबई : बीडीडी चाळीच्या पुनर्विकास बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी पवार यांनी चाळींच्या जागी इमारती उभ्या राहतील पण कष्टकरी माणसाला येथून जाऊ देऊ नका. तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका तसेच या भागातील मराठी टक्का कमी करू नका असे आवाहन पवार यांनी रहिवाशांना केले. त्यामुळे पवारांचा मराठी बाणा दिसून आला.

, खासदार शरद पवार म्हणाले, बीडीडी चाळींना अतिशय गौरवशाली असा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आचार्य अत्रे अशा कितीतरी महान व्यक्ती व क्रांतिकारकांचे वास्तव्य या चाळींमध्ये होते. महाराष्ट्राच्या ऐक्याचे येथे दर्शन घडते. अनेक जाती- धर्माचे लोक वर्षानुवर्षे एकसंधपणे येथे राहत आहेत.अशा या चाळींचा इतिहास आपण जतन केला पाहिजे. या चाळींमध्ये घरासोबतच लोकांना अन्य सुविधाही दिल्या पाहिजेत. चाळींच्या जागी इमारती उभ्या राहतील पण कष्टकरी माणसाला येथून जाऊ देऊ नका. तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका तसेच या भागातील मराठी टक्का कमी करू नका असेही पवार यांनी सांगितले.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, अनेक क्रांतिकारक, साहित्यिकांसह रामनाथ पारकर यांच्यासारखे क्रिकेटपटूही या बीडीडी चाळीमध्ये वास्तव्याला होते. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम करताना अनेक अडचणी येत होत्या. करारनामा, विस्थापितांचे प्रश्न अशी अशी अनेक आव्हाने होती. परंतु त्यातून मार्ग काढला. पुढील 36 महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सुमारे तीन हजार पोलिसांना घरे देण्याचे प्रस्तावित असून येथील निवृत्त पोलीस तसेच 2010 पूर्वीपासून ज्यांचे वास्तव्य आहे अशा पोलिसांनाही घरे देण्याचे नियोजन आहे. कामाठीपुरा व कुलाबा येथील झोपडपट्टीचाही समूह पुनर्विकास करण्यात येणार आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले, अनेक विकासाचे प्रकल्प राज्यात सुरू आहेत. ऐतिहासिक अशी शेतकरी कर्जमाफी या शासनाने दिली.समृद्धी महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. तसेच मुंबईतील कोस्टल रोड, स्कायवॉक, मोनोरेल ही कामही वेगाने सुरू आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे मानाचा तुरा खोवला जाणार आहे. या प्रकल्पातील भाडेकरू रहिवाशांच्या ज्या मागण्या होत्या, त्या मान्य झाल्या असून या पुनर्विकास प्रकल्पातील अडथळे त्यामुळे दूर झाले आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईच्या विकासात श्रमिकांचा मोठा वाटा आहे. मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे व मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळे करू शकणार नाही. मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते “चाळींतले टॉवर” या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *