नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांनी आज येवल्यामध्ये जंगी शक्तीप्रदर्शन केले. छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात आपली ताकद दाखवीत अजित पवार गटाचे नाव न घेता ठणकावले. काही लोक बोलले वय झालं, निवृत्त व्हा, वयाचा उल्लेख कराल तर तुम्हाला महागात पडले असे शरद पवार यांनी थेट जाहीर सभेत अजित पवार यांचे नाव न घेता ठणकावले. अजित पवारांनी वयाच्या मुद्दयावरून शरद पवारांवर थेट हल्लाबोल केला हेाता.
शरद पवारांनी पहिलीची सभा भुजबळांच्या नाशिक येथील येवला येथे घेतली. यावेळी पवारांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत झाले. सभेला संबोधित करताना पवार म्हणाले की, आतापर्यतच्या राजकीय जीवनात अनेक संकटात काही सहका-यांनी साथ सोडली नाही. यावेळी काही सहकारी सोडून गेले. पण आज मी इथे कोणावर टीका करण्यासाठी किंवा कोणाचे कौतुक करण्यासाठी आलो नाही, तर मी जनतेची माफी मागायला आलोय. माझा अंदाज कधीच चुकत नाही, मात्र यावेळी माझा अंदाज चुकला. या चुकीमुळे तुम्हाला त्रास झाला पण मी अशी चूक पुन्हा करणार नाही. योग्य निकाल लावला जाईल अशी ग्वाही देत चुकीच्या गोष्टी घडल्या त्या दुरूस्त केलय पाहिजेत असे सांगून जनतेने पुरोगामी विचारांना साथ द्यावी असे आवाहन पवारांनी करीत छगन भुजबळांवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या पक्षावर, सहकाऱ्यांवर अनेक आरोप केले. जर असे काही असेल तर तुमची सगळी ताकद वापरा आणि चौकशी करा. त्यासाठी आमचा सर्वांचा पाठिंबा राहिल; आणि दोषींना कडक शिक्षा करा..” अशी खोचक टीका यावेळी त्यांनी केली.