मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे समन्वय प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. वाय. बी. चव्हाण सेंटर इथं खासदार सुप्रीया सुळे यांच्या पुढाकारानं या दोघांची भेट झाली. आंबेडकरांच्या इंडिया आघाडीत सामिल होण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यानं पुन्हा राजकीय घडामोडींना वेग येऊ शकतो.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा आयोजित करण्यात आला होता. शरद पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचाही समावेश होता. या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांना शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत कॉफी घेण्याचा आग्रह केला.
या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलले. म्हणाले, “वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये सुप्रिया सुळे यांनी कॉफी पिण्यासाठी आग्रह केला त्यामुळं तिथं शरद पवार यांच्यासोबत आम्ही कॉफी घेतली. पण यावेळी आम्ही बाराजण तिथं उपस्थित होतो. त्यामुळं आमची कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. शरद पवार यांच्याबरोबरच्या आजच्या भेटीत महाविकासआघाडी किंवा इंडियात सहभागी होण्याबाबत काहीच चर्चा झालेली नाही. देशातील आगामी ५ राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही घडले, असं मला वाटत नाही.