नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आज मोठी घोषणा केली.  प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर सुनिल तटकरे यांना पक्षाचे सरचिटणीस केलं आहे. अजित पवार यांच्यावर कोणतीच जबाबदारी सोपवली नसल्याने त्याची चर्चा सध्या रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ वा वर्धापनदिनी दिल्लीत पार पडला. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.  मध्यप्रेदश, गुजरात, राजस्थान, झारखंडची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तर महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर सुनील तटकरे यांच्यावर ओडीशा आणि पश्चिम बंगालची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. 

अखेर पवारांनी भाकरी फिरवलीच…

शरद पवार यांनी मागील महिन्यात राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांनी उपोषण करत राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांचा मान राखून शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला होता. हे सगळं घडत असताना त्यांनी भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. भाकरी वेळेत फिरवली नाही तर ती करपते. हे वक्तव्य केल्यानंतर भाकरी फिरवण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. राष्ट्रवादीची जबाबदारी नेमकी कोणाच्या खांद्यावर येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यात प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोन नावांची चर्चा होती. त्याच नावांवर शरद पवारांनी शिक्कामोर्तब केला आहे. त्यांनी दिल्लीत आज राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून  प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली आहे. दिल्लीतील प्रत्येक कार्यक्रमात सुप्रिया सुळे कायम उपस्थित असतात मात्र या घोषणेवेळी त्या दिल्लीतील कार्यक्रमात उपस्थित नव्हत्या. मात्र अजित पवार या कार्यक्रमात उपस्थित होते.

माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरवेन : सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत आपल्याला दिलेल्या जबाबदारीसाठी आभार मानले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ” राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.”

अजित पवारांनी केले अभिनंदन 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करून नेत्यांचे अभिनंदन केले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे.

आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन ! असं अजित पवारांनी ट्विटमध्ये ्म्हटलय. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!