मुंबई : गेल्या पाच महिन्यात ३९१ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. चार महिन्यात ३ हजार १५२ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यावरून राज्यातील ढासळत्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते. महाराष्ट्र हे शांतता प्रिय राज्य असूनही सातत्याने दंगली होत आहेत. जिथे सत्ताधारी पक्षाची ताकद नाही, तिथे केले जाणीवपूर्वक दंगली निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ व्या वर्धापन दिन सोहळा षण्मुखानंद हाँल येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ते बोलत होते. शरद पवार म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवणं ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण आज जाणीवपूर्वक समाजात जातीय दंगली घडवण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. गेल्या काही महिन्यांत कोल्हापूर, संगमनेर, नांदेड अकोला अमळनेर या सारख्या जिल्ह्यांमध्ये जातीय दंगली झाल्या आहेत. महाराष्ट्रात शांतताप्रिय राज्य असून असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं, असं शरद पवार म्हणाले. अल्पसंख्याक, दलित, आदिवासी, महिला अशा समाजातील लहान घटकांना संरक्षण देण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. महिला संरक्षणाविषयी बोलताना पवार म्हणाले की, राज्यात २३ जानेवारी २०२३ ते २३ मे २०२३ या कालावधीत ३ हजार १५२ मुली आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यातून महिला तसेच मुली बेपत्ता होत असतील, तर राज्यकर्ते काय करत आहेत ? याचा गांभिर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
पवार म्हणाले की, देशात आज शेतकरी अस्वस्थ असून दुखावलेला आहे. कांदा, कापूस आणि सोयबीनसारख्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होत की, आम्ही तीन वर्षात देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, पण आज ९ ते १० वर्ष होऊन गेली असं काहीच घडलं नाही. पण एका गोष्टीत डबल स्थिती बघायला मिळत आहे. ती म्हणजे शेतक-यांच्या आत्महत्या. महाराष्ट्रात गेल्या ५ महिन्यात ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतात याचा अर्थ आज राज्यात काय चित्र आहे, हे मी सांगणं गरजेचं नाही, असंही शरद पवार म्हणाले.
केंद्रातील मोदी सरकारवरही पवार यांनी टीका केली. मणिपूरमध्ये ४५ दिवस दंगल सुरू आहे. मणिपूरमध्ये जे घडत आहे ते गंभीर आहे असे लष्काराच्या एका निवृत्त अधिका-याने केलेले वक्तव्य गंभीर आहे. आम्ही या देशाचे नागरिक आहेात की नाही हेच कळत नाही. चीनच्या शेजारी असलेल्या राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे राज्यकर्ते याकडे लक्ष देत नाही असा आरोप पवार यांनी केला.
नवीन संसदेच्या उद्घाटनावरून बोलताना पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना स्वत:ला संसदेचे उद्घाटन करता यावं त्याठिकाणी त्यांच नाव यावं यासाठीच राष्ट्रपतींना बोलावलं नाही. त्यांना जर बोलावलं असतं तर प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपतींनी उद्घाटन केलं असत असं वक्तव्य पवार यांनी केले.