जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसने जळगावमध्ये जाहीर सभा घेत शक्तीप्रदर्शन केले. या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘नरेंद्र मोदी साहेबांनी काय केलं ? त्यांच्या सत्तेला ९ वर्ष झाली. त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. नरेंद्र मोदींनी फोडाफोडीचं राजकारण केलं, अशा शब्दात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला.
शरद पवार म्हणाले, ‘देशाच्या स्वातंत्र्याआधी ग्रामीण भागातील काँग्रेसचे पहिलं अधिवेशन खान्देशात झालं. या अधिवेशनाला महात्मा गांधी, पंडित नेहरू आले होते. खान्देशाचा इतिहास हा अभिमानाचा आहे’. ‘एकेकाळी देशात उत्तम केळी खान्देशातून जात होत्या. या ठिकाणी उत्तम शेतीचा आदर्श मिळायचा. आता शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकंट आहे. जिल्ह्यात आता पाणी नाही, धरणात पाणी कमी आहे. दुहेरी पेरणी करूनही पिके पडली. दुष्काळामुळ शेतकरी संकटात आहे. माझी खात्री आहे की, परिस्थिती बदलू शकते. मात्र, भाजपला शेतकऱ्यांची चिंता नाही’, अशी टीका शरद पवारांनी केली.
‘देशाची सत्ता चुकीच्या लोकांच्या हातात गेली आहे. यवतमाळमध्ये गेल्या आठवड्यात वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. खान्देशातील येथील लोक भीक मागत नाहीत. त्यांच्या कष्टाची किंमत मागत आहेत, असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले, ‘ मोदी साहेबंनी काय केलं? ९ वर्ष झालं. राष्ट्रीय पक्ष फोडले. शिवसेना-राष्ट्रवादी फोडली. सीबीआय, ईडी सारख्या यंत्रणा मागे लावल्या. अनेकांना तुरुंगात टाकण्याचं काम केलं. भाजपने सत्तेचा गैरवापर केला. मोदींना विनंती आहे की, चुकीचं काम केलं असेल, त्यांची चौकशी करा. खोटे आरोप करू नका,अशी टीका देखील शरद पवारांनी केली .
दोन बायका फजिती ऐका : खडसेंचा हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. खडसे म्हणाले, हे तिघांचं सरकार, एक सिनियर एक ज्युनियर, दोन बायका फजिती ऐका, असं आहे अशी टीका त्यांनी केली. अजित पवार जे बोलतात ते करणार नेते आहेत. मात्र आता आता त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही. काय अवस्था केली. आता तुमच्या सहीनंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांचीही सही घेतली जाते. तुमचा स्वाभिमान गेला कुठे? असा सवाल खडे यांनी अजित पवार यांना केला आहे ते म्हणाले की, ”त्यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ज्यांनी माझ्यावर आरोप केले, ते आज मंत्री झाले. एका भ्रष्ट अधिकाऱ्यासाठी माझ्याविरोधात ठराव केला. लोड शेडींग, सिंचन, रस्ते यासाठी एकमताने ठराव करा. आता खोक्यांमुळे माज आलाय, मस्ती आली आहे. गेल्या एक वर्षांपासून विविध पक्षांच्या सभा या मैदानात होत आहेत. मात्र यापूर्वी एवढी मोठी सभा झाली नव्हती. येवला बीडला सभा झाली, पण त्यापेक्षा अधिक उत्साह इथे जाणवतोय असेही खडसे म्हणाले.
———