मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचेसर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव राज्यासोबत देशाच्या राजकारणामध्ये प्रमुख आणि प्रभावशाली नेत्यांमध्ये घेतले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणातील अनन्य महत्त्व असलेले व्यक्तिमत्व ! राज्यातील कुठल्याही राजकीय घडामोडींच्या मागे पवार यांचा काही तरी अदृश्य हात असतो; तसेच त्यांनी केलेल्या विधानांचे अनेक अर्थ असतात, असा एक पूर्वापार समज आहे. या वयातही तरुणांनाही लाजवेल असा उत्साह शरद पवारांमध्ये आहे. शरद पवार यांच्याकडे कोणताही प्रश्न कि तो चुटकीसरशी सुटतो. असाच कित्येक वर्षापासून प्रलंबीत असलेला निवासी डॉक्टरांच्या वेतनाप्रश्न पवारसाहेबांच्या एका फोनने सुटला आहे. निवासी डॉक्टर विद्यार्थ्यांना १५ हजारावरून थेट ५० हजार वेतन मिळणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात गेली कित्येक वर्षे इंटर्नशिप करणार्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात ५० हजार रुपये वाढ व्हावी यासाठी आज बीएमसी मुंबई सीपीएस स्टुडंट असोसिएशनच्या निवासी डॉक्टरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. निवासी डॉक्टरां विद्यार्थ्यांची व्यथा ऐकल्यानंतर शरद पवारांनी थेट मुंबई आयुक्त इक्बालसिंग चहल यांना फोन करत या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतन ५० हजार करण्याची मागणी केली, आणि पवार साहेबांच्या एका फोन नंतर आयुक्तांनी तात्काळ ५० हजार विद्यावेतन देण्याचे जाहीर केले.
मागील दहा ते पंधरा वर्षापासून मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात इंटर्नशिप करणार्या निवासी डॉक्टर विद्यार्थ्यांना फक्त पंधरा हजार एवढेच विद्यावेतन देण्यात येते. राज्यातील इतर ठिकाणी निवासी डॉक्टरांना ५० हजाराच्यावर विद्यावेतन मिळते. मागील वर्षी मुंबई मनपा फी आकारत नव्हती मात्र यावर्षी एक लाख पंधरा हजार रुपये प्रत्येक इंटर्नशिप करणार्या विद्यार्थ्यांना आकारली आहे. हे निवासी डॉक्टर इतर डॉक्टरांप्रमाणे २४ तास सेवा देत आहेत. सध्या हे विद्यार्थी जी फी भरत आहेत तीच पगाराच्या रुपात त्यांना मनपा प्रशासन परत करत आहे. म्हणजे एमबीबीएस होऊन मुंबई मनपा दवाखान्यात २४ तास फुकट काम करुन घेतले जात आहे अशी त्यांची धारणा झाली आहे. नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये पगार देत आहे. मग जगातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिका या निवासी डॉक्टरांना इतका पगार का देत नाही असा सवालही या संघटनेने केला आहे.
मुंबई मनपाच्या दवाखान्यात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांवर त्यांच्या घरांचीही जबाबदारी आहे. मात्र एवढ्या कमी पगारात काम करवून मुंबई मनपा अन्याय करत आहे असा आरोपही बीएमसी मुंबई सीपीएस स्टुडंट असोसिएशनने शरद पवार यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिकेत मवाळ,डॉ.रोशन गायकवाड, डॉ. आदित्य मवाळ आदी प्रतिनिधींनी शरद पवार यांची भेट घेतली. अखेर शरद पवार यांच्या एका फोनने निवासी डाॅक्टर विद्याथ्यांना न्याय मिळाला आहे