राज्य शासनाने दिलेला पुरस्कार अपंगाने विकायला काढला

पुनर्वसनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कडोंमपाच्या कारभाराचा अजब निषेध

कल्याण  : अधिकृत दुध विक्री केंद्रावर कल्याण डोंबिवली महापालिकेने हातोडा मारल्याने आपल्याला रोजगाराचे साधन राहिले नसून आपले पुनर्वसन करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या कारभाराचा निषेध करीत शंकर साळवे या अपंग व्यक्तीने बुधवारी पालिकेच्या मुख्यालयासमोर राज्य शासनाने त्यांना दिलेला पुरस्कार विकण्यासाठी बस्तान मांडले. या घटनेने महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कारभाराची लक्तरे शहरवासीयांसमोर टांगली गेली आहेत.

कल्याण जवळील मोहोने येथे राहणारे शंकर साळवे यांना २०१३ रोजी राज्य शासनाने पुरस्कार प्रदान केला होता. साळवे दाम्पत्यांचे  कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील अधिकृत दूध केंद्र होते. ते दुध केंद्र त्या दाम्पत्यांचे उदरनिर्वाहाचे साधन होते. मात्र पालिका प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता दोन वर्षापुर्वी त्यांच्या दुकानावर हातोडा मारला. गेल्या दोन वर्षापासून साळवे यांनी या दुध केंद्राच्या पुनर्वसनासाठी महापालिकेच्या मुख्यालयात अनेकदा पत्रव्यवहार केला. त्याचा काही उपयोग न झाल्याने साळवे यांनी २७ ऑक्टोंबर रोजी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शासनाने देखील साळवे यांना दूध विक्री केंद्रासाठी नियमानुसार पर्यायी जागा देण्याबाबत पालिकेला पत्र पाठवले होते.
दरम्यान, महापालिका आयुक्तानी अतिरिक्त आयुक्त संजय घरत, उपायुक्त तोरस्कर आणि अनिल लाड या अधिकाऱ्यांना ताबडतोब साळवे यांचे पुनर्वसन करण्याचे तोंडी आदेश दिल्याचे साळवे यांचे म्हणणे आहे. मात्र त्याला तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप काही कार्यवाही न झाल्याने अखेर बुधवारी शंकर साळवे दाम्पत्याने कल्याण येथील पालिकेच्या मुख्यालयासमोर राज्य शासनाने त्यांनी अपंगासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिलेला पुरस्कारच आज विकायला काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *