शन्ना डे….साहित्याने आनंदाचे झाड फुलवणारं एक व्यक्तिमत्व
डोंबिवली : ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांचा आज जन्मदिवस. शंकर नारायण नवरे हे सर्व महाराष्ट्राला परिचित होते. त्यांना शंना म्हणून ओळखले जायचे. कादंबरी, कथा, ललित लेख नाटकं असं चौफेर लेखन त्यांनी केलंय. सर्वसामान्यांच्या चाकोरीतील आयुष्यात आपल्या साहित्याने आनंदाचे झाड फुलवणारे एक नाव म्हणजे श ना नवरे.
डोंबिवली गावावर त्यांचे अतोनात प्रेम होते. ‘डोंबिवली भूषण’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होतेच पण ते खऱ्या अर्थाने या शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीतील महत्त्वाचा दुवाही होते. डोंबिवलीविषयी त्यांच्या मनातले ममत्व कायम होते त्यामुळेच नातेवाईक तसेच मित्रांनी आग्रह करूनही त्यांनी मुंबईत कायमचे वास्तव्य केले नाही. नोकरीनिमित्त मुंबई ही फक्त त्यांची कर्मभूमीच राहिली. सामान्य, मध्यमवर्गियांच्या जाणीवा, सुख-दु:खाच्या व्यथा आणि वेदना त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीतून, रंगमंचीय अविष्कारातून समाजासमोर आणल्या.
२१ नोव्हेंबर १९२७ साली त्यांचा जन्म झाला होता. प्राथमिक शिक्षण डोंबिवलीतल्या लोकल बोर्ड शाळेत तर माध्यमिक शिक्षण डोंबिवलीच्या इंग्लिश स्कूलमध्ये आणि दादरच्या किंग जॉर्ज शाळेत झालं. १९४५ मध्ये शालांत परीक्षा पास झाल्यावर त्यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर्स, सिद्धार्थ कॉलेज आणि पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. १९४९ साली त्यांनी बी.एस्सीची पदवी मिळवली. त्यांनी सुरूवातीला डोंबिवलीत शिक्षकाची नोकरी केली होती. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात शासकीय नोकरीही केली मात्र काही काळानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. .शं.ना. नवरे यांचं व्यक्तिमत्व अतिशय लोभस आणि लोकप्रिय होतं. ते अतिशय शैलीदार वक्ते आणि माणसांमध्ये रमणारे लेखक म्हणून प्रसिद्ध होते. शंनांच्या लेखनानं वाचकांना कधी अंतर्मुख केलं तर प्रसंगी रिझवलेही. डोंबिवलीत झालेल्या २००३ सालच्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले. शनांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. २५ सप्टेंबर २०१३ रोजी डोंबिवलीतील राहत्या घरी त्याचं निधन झालं. त्यांच्या जयंतीदिनानिमित्त सिटीझन जर्नलिस्टकडून आदरांजली.
शन्नांची साहित्य संपदा-
कथासंग्रह – तिळा उघड, जत्रा, कोवळी वर्ष, इंद्रायणी, सखी, खलिफा, भांडण, बेला, झोपाळा, वारा, निवडुंग, परिमिता, मनातले कंस, शहाणी सकाळ, बिलोरी, मार्जिनाच्या फुल्या, अनावर, एकमेक, मेणाचे पुतळे, सर्वोत्कृष्ट शन्ना, तिन्हीसांजा, शांताकुकडी, कस्तुरी, पर्वणी, झब्बू, पाऊस, निवडक, पैठणी
कादंबरी – सुरुंग, संवाद, दिवसेंदिवस, नो प्रॉब्लेम, दिनमान, आनंदाचं झाड, कौलं, अट्टहास.
ललित लेखसंग्रह – कवडसे, शन्नाडे, झोपाळा, उनसावली, झोका, ओलीसुकी
नाटक – एक असतो राजा, मन पाखरू पाखरू, धुक्यात हरवली वाट, नवरा म्हणू नये आपला, ग्रँड रिडक्शन सेल, सुरुंग, धुम्मस, सूर राहू दे, गुंतता हृदय हे, हवा अंधारा कवडसा, गहिरे रंग, गुलाम, वर्षाव, रंगसावल्या, हसत हसत फसवुनी, मला भेट हवी हो.
नाटय स्पध्रेतील अप्रकाशित नाटके
पाचोळा जळत नाहीए, हत्ती आणि आंधळे, धनंजयांचा खून खून आणि खून, ते एक स्वप्न होते स्वप्नात पाहिलेले.
टेलिफिल्म्स– उद्याची गोष्ट, नवीन आज चंद्रमा, काटा रुते कुणाला, पाठलाग, संकेत, गोष्ट निघांची, त्या तिथे पलिकेडे इत्यादी .
=चित्रपट : घरकुल, बाजीरावचा बेटा, बीरबल माय ब्रदर (इंग्रजी), कैवारी, हेच माझं माहेर, असंभव (हिंदी), कळत नकळत, जन्मदाता, निवडुंग, सवत माझी लाडकी, तू तिथं मी, झंझावात, मी तुझी तुझीच रे, एक उनाड दिवस, आनंदाचं झाड
पुरस्कार : पु. भा. भावे पुरस्कार, सु. ल. गद्रे मातोश्री पुरस्कार, नाटयभूषण पुरस्कार, अखिल भारतीय नाटय परिषदेचा गडकरी पुरस्कार, मराठी साहित्य परिषदेचा कमलाकर सारंग पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, जेष्ठ साहित्यिक पुरस्कार, तेजस पुरस्कार, वि. वा. शिरवाडकर पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार, प्रज्ञा गौरव पुरस्कार, गदिमा पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार.
—————