छप्पर गळतीमुळे ओपिडीत येणाऱ्या आदिवासी रुग्णांची हेळसांड 

ठाणे / अविनाश उबाळे : शहापूर पासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या व प्रचंड आदिवासी बहुल व अतिदुर्गम भाग असलेल्या अघई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला पावसाळ्यात गळती लागली आहे.आरोग्य केंद्राचे छप्पर मोठ्या प्रमाणावर गळत असल्याने या गळतीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतीगृह,आणि नवजात शिशु दक्षता कक्षात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. बेडवरील गाद्या,चादरी,आरोग्य केंद्रातील इतर महत्त्वाचे साहित्य,व औषधे पाण्यात भिजत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.आरोग्य केंद्राच्या या गळतीमुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या आदिवासी रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे.तर आरोग्य केंद्राच्या गळतीमुळे येथे काम करणं डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रासदायक झाले आहे.


आघई प्राथमिक आरोग्य केंद्राची ही गळती रोखण्यासाठी पावसाळ्यापूर्वी आरोग्य केंद्राच्या शेडची तात्पुरती डागडूजी केल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र हे करण्यात आलेले डागडूजीचे काम अगदी थातुरमातुर उरकण्यात आले होते.परिणामी पावसाळ्यात आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीला गळती लागलीआहे.सर्वत्र लाद्या,भिंती पाण्याने ओल्याचिंब झाल्या असून पाण्याच्या धारा वाहू लागल्या आहेत.पाणीच पाणी झाल्याने येथील प्रसूती गृह कक्षातील बेड व त्यावरील गाद्या,चादरी पूर्णपणे ओल्याचिंब भिजलेल्या दिसत आहेत गळतीमुळे येथील औषध साठा ही भिजत आहे.पंखे,लाईटचे बोर्ड पुर्णपणे भिजत आहेत यामुळे विजेचा शॉक लागण्याचीही भीती आहे.

आरोग्य केंद्राची ही छप्पर गळती थांबविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना छप्परवर प्लास्टिक टाकावे लागले आहे.तरीही येथील गळती मात्र सूरुच आहे. आरोग्य केंद्रात सर्वत्र पाणीच पाणी पाहण्यास मिळत आहे. जिथे गळती लागली आहे. त्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांना बादल्या मांडाव्या लागल्या आहेत.आरोग्य केंद्राला गळती लागल्याने ही इमारती अत्यंत धोकादायक झाल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा व आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा जीवीतास धोका निर्माण झाला आहे.

अघई आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती लागल्याची माहिती येथील डॉक्टरांनी शहापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ भाग्यश्री सोनपिंपळे यांना दिली त्यांनी याबाबत ठाणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना लेखी कळविले आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी सोनपिंपळे यांनी दिली. परंतु जिल्हा आरोग्य विभागाने याबाबत तातडीने आरोग्य केंद्राची गळती रोखण्यासाठी अद्याप कोणत्याच उपाययोजना न केल्याने मोठं आश्चर्य व्यक्त होत आहे.अघई प्राथमिक आरोग्य केंद्राची गळती कायम असून या गळतीमुळे आदिवासी रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होत असल्याचे भयानक असे वास्तव येथे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!