डोंबिवली : महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील दोन आठवड्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये दोन घटना, वसईमध्ये एक घटना अशा अनेक घटना समोर येत आहेत, त्यामुळे लहान मुलींमध्ये त्याचबरोबर त्याच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आता कल्याण पूर्वेकडील आडीवली परिसरात राहणाऱ्या एका दहा वर्षीय मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मानपाडा पोलिसांनी धर्मेंद्र यादव नावाच्या या नराधमाला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
कल्याण पूर्वेकडील मलंगगड रोडला असलेल्या आडवली परिसरात एक दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी खेळताना एका मुलासोबत आरोपींच्या घरात गेली. मुलगी घरात येताच मुलाच्या वडिलांनी तिला स्वतःजवळ बोलून घेतले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलीने आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी त्वरित मुलीसोबत मानपाडा पोलीस ठाणे गाठले. घडल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने आणि पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपास सुरू झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी धर्मेंद्र यादव याला अटक करण्यात आली.