ठाणे : डोंबिवलीतील पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील हायप्रोफाईल सोसायटी असलेल्या शंखेश्वर गृहसंकुलात मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला दलालांचा ठाणे येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात नवी मुंबईतील उलवे येथील येथील मसाज पार्लर चालविणाऱ्या महिले विरुध्द पोलिसांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल केला आहे. जयश्री प्रमोद मुंढे असे मसाज पार्लरच्या नावाने सेक्स रॅकेट चालविणाऱ्या आरोपी महिला दलालाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दलाल महिला ही हायप्रोफाईल सोसायटी असलेल्या शंखेश्वर गृह संकुलातील सदनिका क्रमांक सहा, पहिल्या माळ्यावर संस्कृती ब्युटी आणि मेडी स्पा नावाने मसाज पार्लर चालवित होती. या पार्लरमधून दोन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. या महिला घरची आर्थिक बेताची परिस्थिती आणि उपजीविकेचा विचार करून या अनैतिक व्यवसायात ( वेश्या व्यसायात) उतरल्या होत्या, असे पोलीस तपासात उघडकीला आले.
ठाणे येथील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना शुक्रवारी एका अनोळखी व्यक्तिने संपर्क साधला. डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील शंखेश्वर गृहसंकुलाच्या एका सदनिकेत मसाज पार्लरच्या नावाने वेश्या व्यवसाय चालविला जात आहे, अशी माहिती दिली. संस्कृती ब्युटी आणि मेडी स्पा शाँप नावाने हे पार्लर चालविले जात होते. या केंद्रात मसाजसाठी एक हजार रूपये आणि शरीरसुखासाठी वाढीव एक हजार पाचशे रुपये वाढीव आकारले जात होते. दोन हजार पाचशे रुपयांचा भरणा मसाज पार्लरमध्ये केला की सेक्स करण्यासाठी या पार्लरची चालिका ग्राहकाच्या आवडीप्रमाणे त्याला पीडित महिला उपलब्ध करून देत होती.
या अनैतिक व्यवसायाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वालगुडे आणि त्यांचे पथक डोंबिवलीत संस्कृती मसाज पार्लरवर छापा टाकण्यासाठी दाखल झाले. त्यांना टिळकनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक ममता मुंजाळ यांचे सहकार्य मिळाले.
मसाज पार्लर अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक पाठवून तेथे अनैतिक व्यवसाय चालतो का याची खात्री केली. बनावट ग्राहक पोलिसांनी खुणा करून दिलेले पैसे घेऊन पार्लरमध्ये गेला. पार्लरमध्ये जाताच त्याच्याकडून दोन हजार ५०० रुपये घेण्यात आले. त्याच्या मागणीप्रमाणे शरीरसुखासाठी एक महिला त्याला उपलब्ध करून देण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या सूचनेप्रमाणे बनावट ग्राहकाने खोलीतून पोलिसांना मोबाईलवर संपर्क करून इशारा करताच वरिष्ठ अधिकारी चेतना चौधरी, ममता मुंजाळ आणि कारवाई पथक संस्कृती मसाज पार्लरमध्ये दाखल झाले. त्यावेळी तेथे दोन पीडित महिला आढळून आल्या. एक डोंबिवलीतील आयरेगाव, एक मुंबईतील ॲन्टाॅप हिल भागातील होती. या महिला ३५ ते ३८ वयोगटातील आहेत. कारवाईच्या ठिकाणी सात हजार, इतर साधने आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली. मसाज पार्लर चालकाने अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याने पोलिसांनी मसाज पार्लर चालक जयश्री मुंढे हिच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. डोंबिवली, कल्याण शहर परिसरातील मसाज पार्लरची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.