डोंबिवली :  एमआयडीसी निवासी मधील मिलापनगर तलावात जवळच असलेल्या गटाराचे सांडपाणी गेल्या काही दिवसांपासून मिसळले जात असून त्यामुळे तलावाचे पाणी खराब व हिरवट होऊन दुर्गंधी येत आहे. तलावाचा समोरील रस्ता हा काँक्रीटीकरण झाल्यावर या तलावापेक्षा रस्त्यांची उंची अंदाजे एक ते दीड फूट वाढली आहे. रस्ता आणि तलाव यामध्ये असलेले जुने गटार बुजले गेल्याने आणि नवीन गटार न बांधल्याने गटारीचे सांडपाणी थेट तलावात जात आहे. शिवाय सांडपाणी वाहिन्या/चेंबर काही ठिकाणी लिकेज झाल्याने तेही सांडपाणी तलावात जात आहे.

  मिलापनगर तलावात काही वर्षांपूर्वी गणेश/नवरात्र उत्सवात मुर्त्यांचे विसर्जन मोठ्या प्रमाणत केले जात होते. तलावाची साफसफाई वेळोवेळी नीट न ठेवल्याने त्यावेळी या तलावातील मासे, कासवे इत्यादी जलचर प्राणी मृत्युमुखी पडत होते. स्थानिक रहिवाशी संघटनेने याची तक्रार राष्ट्रीय हरित लवादाकडे केल्यावर लवादाने याची गंभीर दखल घेऊन या तलावातील मुर्त्या विसर्जनास सन 2017 पासून बंदी घातली होती. 

  मिलापनगर गणेश विसर्जन तलावाचे दोन वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे २५ लाख खर्च करून सुशोभीकरण करण्यात आले होते. पण आता या तलावाची पुन्हा दुर्दशा झाली असून जर हा तलाव वाचवायचा असेल तर प्रथम गटाराचे सांडपाणी तलावात जाण्यापासून रोखले पाहिजे. निर्माल्य, कचरा या तलावात टाकण्यापासून जनतेला परावृत्त कसे करता येईल तेही पहिले पाहिजे. या तलावात मोठ्या प्रमाणत मासे, कासवे हे जलचर प्राणी आहेत. तसेच तलाव भोवती अनेक विविध पक्षांचे वास्तव्य असते. जर या तलावाकडे केडीएमसी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास यातील जलचर प्राणी मृत्युमुखी पडण्याची शक्यता असून हा तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असे दिसते आहे. असे जर खरेच झाले तर पुढे येथे अनधिकृत/अधिकृत टोलेजंग इमारत उभी राहण्यास वेळ लागणार नाही. त्यादृष्टीने काही जणांचे प्रयत्न चालू आहेत असे पण समजते आहे. “तलाव वाचवा” असे पुढे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *