कल्याण दि.4 जानेवारी : येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी अतिशय भव्य दिव्य असा सोहळा आयोजित करण्यात आला असून देशभरातील अनेक दिग्गज व्यक्तींना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. कल्याणातील ज्येष्ठ शिक्षिका मंजिरी मधुकर फडके यांनाही अयोध्येतील या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
येत्या 22 जानेवारीला देशाच्या इतिहासात सुवर्णक्षणाची नोंद होणार असून यासाठी केवळ आयोध्याच नव्हे तर संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली असून देशभरातील केवळ 6 ते 7 हजार व्यक्तींनाच श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे आमंत्रण पाठवण्यात आलेली आहेत.
या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो लोकांचा जनसागर उसळण्याची शक्यता गृहीत धरून निमंत्रण पत्रिका असणाऱ्यांनाच याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. त्यामूळे देशातील दिग्गज उद्योगपती, नेते, कलाकार, लेखक आदी सन्माननीय व्यक्तींचा समावेश आहे. त्यात आता कल्याणातील ज्येष्ठ लेखिका आणि आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त मंजिरी फडके यांनाही या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका प्राप्त झाली आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या प्रतिनिधींनी आज मंजिरी फडके यांच्या निवासस्थानी जाऊन या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे रितसर निमंत्रण देण्यात आले. त्यामुळे फडके कुटुंबीयांसह कल्याणातील रामभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच मंजिरी फडके यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.