मुंबई, पुणे, कल्याणात भिंत कोसळून 21 जणांचा मृत्यू
मुंबई : मगळवारी राज्यात तीन ठिकाणी भिंत कोसळून नागरिकांचे जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत मालाडमध्ये 12, पुण्यामध्ये 6 तर कल्याणमध्ये भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे.
मालाड पूर्व पिंपरीपाडा झोपडपट्टीवर संरक्षक भिंत कोसळली असून, यामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४० जण जखमी झाले आहेत. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे भीती व्यक्त केली जात आहे.
कल्याणमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.. कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी किल्ला परिसरात नॅशनल उर्दू शाळेची संरक्षक भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रात्री 12.30 च्या सुमारास घडली. मृतांमध्ये 3 वर्षाच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे. मृतांमध्ये करीना मोहम्मद चांद (२५), हुसेन मोहम्मद चांद (३), शोभा कचरू कांबळे (६०) यांचा समावेश असून आरती कर्डीले (१६) ही तरुणी जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
पुण्यातील आंबेगांव सिंहगडमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. कात्रज या परिसरातील सिमाभिंत कोसळली असून या दुर्घटनेत ६ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राधेलाल पटेल (२५), जेटू लाल पटेल (५०), ममता राधेलाल पटेल (२२) आणि जेटू चंदन रवते अशी मृतांची आत्तापर्यंत समजलेली नावे असून या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलातर्फे मदत आणि बचावकार्य सुरू आहे.