कोकणच्या राजकारणात उलट सुलट चर्चांना सुरूवात

ठाणे : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौ-यानंतर मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता असून त्यांचे कट्टर समर्थक आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते तथा मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंच्या दौ-यानंतर शिवसेना नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांतच ठाकरे यांच्या व्यासपीठावरील लोकप्रतिनिधी आमच्याकडे येतील, असे मोठे विधान केले होते. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
वैभव नाईक आणि रवींद्र चव्हाण या उभयतांमधील भेटीमुळे कोकणच्या राजकारणात उलट सुलट चर्चांना सुरूवात झाली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांची कणकवलीतील शासकीय विश्राम गृहावर एका खोलीत भेट झाली. या भेटीच्या वृत्ताने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. वैभव नाईक हे श्ािंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या अधून मधून बातम्या येत असतात. मात्र आज अचानक वैभव नाईक यांनी भाजपच्या रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सर्वांनाच धक्का दिला. या भेटीचा तपशील अद्यापपर्यंत समजला नसला तरी या भेटीला वैभव नाईक यांनी दुजोरा दिलेला आहे.
अलिकडे राणे आणि नाईक एकमेकांवर टीका करणे टाळत होते. भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्ग येथे राणे यांच्यावर टीका केल्यावर लगेचच निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतही वैभव नाईक यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला निलेश राणे यांनी थेट टीकात्मक उत्तर देणे टाळले होते. उद्या भास्कर जाधव यांना उत्तर देण्यासाठी निलेश राणे सभा घेणार आहेत. या सभेत ते याच भेटीबाबत काही बोलतात का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *