ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपच्या एका नेत्याच्या पत्नीची किरण गोसावीच्या कंपनीत पार्टनरशीप असल्याचा आरोप करून हिवाळी अधिवेशात पर्दाफाश करण्याचा इशारा दिला होता. मात्र तत्पुर्वीच भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी याबाबत खुलासा करून हे आरोप फेटाळून लावीत किरण गोसावी दुसरा असल्याचे स्पष्ट केलय. तसेच तो किरण गोसावी मी नव्हेच, असा दावाही या किरण गोसावीने केल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
आर्यन खान अटक प्रकरणात नवाब मलिक पत्रकार परिषद घेऊन दररोज नवनवीन धुराळा माहिती काढीत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मलिक यांनी भाजपवर निशाना साधला. ठाण्यातील एका भाजप आमदाराच्या कंपनीत आरोपी किरण गोसावीची भागीदारी असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी हिवाळी अधिवेशनात खुलासा करण्याचा दावाही केला होता. मलिकांच्या आरोपानंतर तो भाजप आमदार कोण ? अशी चर्चा रंगली होती. अखेर भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन् याचा खुलासा केला आहे. डावखरे यांची व्यावसायिक भागीदारी एका किरण गोसावी नावाच्या व्यक्तीशी आहे मात्र तो किरण गोसावी वेगळा असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिलय. या पत्रकार परिषदेत ठाण्यातील एक किरण गोसावी उपस्थित होते. माझं नाव किरण गोसावी आहे. माझ्या नावातील साम्यामुळे सर्व घोळ झाला आहे. माझीही चौकशी करण्यात आली. मी पोलिसांना सर्व पुरावे दिले आहेत, असं गोसावी यांनी सांगितलं.