ठाणे : ठाण्याच्या मासुंदा तलावात दरवर्षीपमाणे यंदा सीगल्स अर्थात कुरव या परदेशी पक्षांचे आगमन झालं आहे. भारतात हिवाळ्याच्या सुरुवातीला सुमारे २३० प्रकारचे पक्षी परदेशांतून स्थलांतर करून येतात. यामध्ये सीगल्स म्हणजेच कुरव पक्षीही हजारोंच्या संख्येने किनारपट्टीच्या प्रदेशात स्थलांतर करतात. सप्टेंबर ते एप्रिल दरम्यान हे अतिथी आपल्याला पाणथळ जागा जसे की समुद्रकिनाऱ्यांवर, खाडीक्षेत्र अथवा तलावांवर स्वछंदीपणे विहार करताना आढळतात. त्यांना इतक्या जवळून पाहणे ही एकप्रकारे पर्वणीच असते, त्यामुळे पक्षी अभ्यासक, फोटोग्राफर तसेच सामान्य नागरिक कुरव पक्ष्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात.
ठाण्याला विस्तीर्ण असे खाडीक्षेत्र लाभले आहे. त्यामुळे दरवर्षी नित्यनेमाने अनेक प्रकारचे स्थलांतरित पक्षी आपल्याकडे पाहावयास मिळतात. ठाण्याची खाडी जशी जगप्रसिद्ध आहे तसेच ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. आजमितीस ठाण्यामध्ये ३५ तलाव आहेत. या तलावांमध्येसुद्धा गेल्या काही वर्षांपासून स्थलांतरित कुरव पक्षी आढळून येत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या तलावांची या पक्ष्यांनी तात्पुरत्या निवाऱ्यासाठी केलेली निवड ही ठाणेकरांची निश्चितच गौरवास्पद बाब आहे. कारण याचा सरळसरळ अर्थ असा होतो की त्यांना या भागात आपल्या जिवाच्या तसेच अन्नाच्या सुरक्षिततेची हमी वाटत असणार.
कुरव पक्षी सर्वभक्षी आहेत. पाणथळ जागांवरच्या अधिवासात सामान्यतः जिवंत व मृत छोटे मासे , खेकडे, किडे यांवर त्यांची गुजराण चालते. त्यांना परतीच्या प्रवासासाठी लागणारी ऊर्जा नैसर्गिकरित्या प्राप्त होत असलेल्या या अन्नाद्वारे प्रथिने व जीवनसत्वांमधून मिळते. अतिरिक्त ऊर्जा हि चरबीच्या रुपात शरीरात साठवून ठेवली जाते. परतीचा प्रवासात अन्नाबाबत शाश्वती नसते तसेच प्रवास निर्धारित वेळेत पार पाडावयाची असतो कारण विणीच्या हंगामासाठी त्यांना हिमालयामधील आपल्या अधिवासात त्याची जय्यत तयारी करावयाची असते . हि सर्व गणिते जुळवायची तर त्यांचा विणीपूर्व स्थलांतराचा हंगाम हा चांगलेचुंगले अन्न खाऊन धष्टपुष्ट होण्याचा असायला हवा. परंतु आजकाल ठाण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये नागरिकांकडून त्यांना शेव गाठी पाव बिस्किटे इतर धान्य असे चारण्याचा प्रकार सर्रास घडताना दिसतो आहे. यापाठी नागरिकांचा हेतू जरी चांगला असला तरी यामुळे पक्ष्यांचे फार मोठे नुकसान होते आहे. त्यामुळे पक्षांना घातक अन्न टाकू नयेत असे आवाहन पक्षीप्रेमींकडून केले जात आहे.