मुंबई, दि. ५ : ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प (Desalination) राबविण्यासाठी जिल्ह्यातील महानगरपालिकांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. भविष्यात होणा-या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करा असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे दिले.

नेपिपन्सी रोड येथील राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण (Desalination) प्रकल्प राबविण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे यांनी संबंधितांना प्रकल्प राबविण्यासंदर्भात तातडीने बैठक आयोजित करून पुढील कार्यवाही संदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीस ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.विपीन शर्मा, भिवंडीचे आयुक्त सुधाकर देशमुख , मिरा भाईंदरचे आयुक्त दिलीप ढोले, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले, भविष्यातील पाणी टंचाईच्या समस्या सोडविण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुध्दीकरण करणारा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प ठाणे, नवी मुंबई , कल्याण डोंबिवली, मिरा- भाईंदर आणि भिवंडी महानगरपालिकेने एकत्रितपणे राबविणे गरजेचे आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होण्यासाठी संबंधित महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तातडीने बैठक आयोजित करून प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाहीचा अहवाल सादर करावा असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!