देशातील दुर्गम शहरे विमानसेवेने जोडण्याचा मार्ग सुकर  :  मुंबईत सीप्लेनची यशस्वी चाचणी 
 मुंबई : मुंबईच्या समुद्रातून सीप्लेन सेवा देण्यासाठी स्पाईसजेट या कंपनीने पुढाकार घेतला असून, शनिवारी गिरगाव चौपाटीवर सी प्लेनची यशस्वी चाचणी पडली. यावेळीं केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री अशोक गजापती राजू, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूूक मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते. सीप्लेन मुळे देशातील लहान मोठी शहरे, दुर्गम भाग विमान वाहतुकीच्या नकाशावर येण्यास मदत होणार आहे.
देशात व्यावसायिक पातळीवर सीप्लेन सेवा सुरू करण्यासाठी स्पाईसजेट कंपनीने आॅक्टोबर महिन्यात जपानच्या सेटोची होल्डिंग्ज या कंपनीबरोबर परस्पर सामंजस्य करार केला होता. या कराराच्या माध्यमातून कंपनी शंभरपेक्षा जास्त सीप्लेन खरेदी करणार आहे. कोणत्याही धावपट्टीची गरज न भासता पाण्यावरून उड्डाण विमानसेवा उपलब्ध करून देणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. विमानात 10 ते 14 जण प्रवास करु शकतात. सी प्लेनमुळे प्रादेशिक कनेक्टीव्हिटी वाढण्यास मदत होईल. शिवाय आपत्कालीन परिस्थितीतही या विमानाचा वापर करता येईल.
 केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, देशाला ७,५०० किलोमीटरचा सागरी किनारपट्टी लाभली आहे.सीप्लेनसाठी केवळ ३०० मीटरची धावपट्टी आवश्यक असते. त्यामुळे जलायशयांमधून अशा प्रकारची विमानसेवा देण्यात अडचण येणार नाही. मुंबईतील  विमानतळांची क्षमता संपली असल्याने अशा परिस्थितीत सीप्लेन हा चांगला पर्याय ठरू शकतो असेही गडकरी म्हणाले. तसेच जपान, अमेरिका, कॅनडामध्ये सीप्लेन सेवेसाठी विशिष्ट नियम आहेत. या नियमांचा अभ्यास करून देशात तसेच महाराष्ट्रात सीप्लेन सेवा सुरू करण्यासाठी तीन महिन्यात सर्व नियमावली तयार करून वर्षभरात ही सेवा सुरू करण्यात येईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू म्हणाले की, या सेवेमुळे  देशातील लहान मोठी शहरे विमान वाहतुकीच्या नकाशावर येणार आहेत. हवाई वाहतूक क्षेत्र हे रोजगार देणारे सर्वात मोठे क्षेत्र आहे. सीप्लेनच्या माध्यमातून पर्यटनातील रोजगार वाढण्यास मदत मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
———-
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *