ठाणे : गणेशमूर्ती बुक केल्यास मोफत घरपोच सेवा… गणेशमूर्तीसह आकर्षक भेटवस्तू… आणि दोन फुटापर्यंत गणेशमूर्तीच्या किंमतीत सूट… यासह अनेक आकर्षक सवलतींची खैरात सध्‍या स्‍टॉलधारकांकडून होत आहे. त्यामुळे पिढीजात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडील गणेशमूर्ती विक्रीविना पडून आहे. आधीच कोरोना संकट… त्‍यात सरकारची नियमावली आणि स्‍टॉलधारकांच्‍या मक्तेदारीमुळे मूळ गणेशमूर्तिकारांवर आर्थिक संकट कोसळले आहे.


ठाण्यात आजच्या घडीला एक हजारच्या आसपास स्टॉलधारक आहेत. स्टॉलधारक विविध ठिकाणांहून गणेशमूर्ती खरेदी करतात. त्यानंतर मिळेल त्या किमतीत विक्री करतात. त्यामुळे कलेवर पोट असणाऱ्या मूर्तिकारांचे भवितव्य अधांतरी आहे. या आधी मूर्तीवरील कलाकुसर पाहून त्याला किंमत देणारे भाविक होते; मात्र वाढत्या स्टॉलधारकांमुळे मूर्तीची किंमत आज केली जाते. यापूर्वी महिनाभरातच एक हजारांच्‍या आसपास गणेशमूर्ती बुकिंग होत असे. मात्र, आता फक्‍त २०० ते २५० गणेशमूर्तींचे बुकिंग झाले आहे. स्‍टॉलधारकांच्‍या वाढत्‍या संख्‍येमुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे ठाणे गणेशमूर्ती संघटना, महाराष्ट्र गणेशमूर्ती संघटना आणि पेण-जोहे- हमरापूर गणेशमूर्ती संघटनांनी याप्रश्नी जातीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे; अन्यथा येत्या काही वर्षांत सर्वच गणेशमूर्ती व्यावसायिकांना रस्त्यावर येण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती ज्येष्ठ मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी व्‍यक्‍त केली.


सरकारी नियमावलीचा फटका
कोरोना संकटामुळे बहुतांश ग्राहक कार्यशाळेत जाऊन गणेशमूर्ती बुकिंग करण्याचे टाळत आहे. त्यामुळे ऑनलाईन गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे कल वाढतच आहे. त्यात गेल्या काही वर्षांत जागोजागी गणेशमूर्तीचे स्टॉल लागले आहेत. कमी किमतीसह आकर्षक सवलतींमुळे ग्राहकांनी मूळ गणेश व्यावसायिकांकडे पाठ फिरवली आहे. सरकारच्या नियमावलीमुळे आठ ते दहा फुटांपर्यंतच्‍या गणेशमूर्तीना बंदी आहे. त्याचा परिणामही व्यवसायावर झाला असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाल्याचे ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील मूर्तिकार सिद्धेश बोरीटकर यांनी सांगितले.

पेन्शन योजना सुरू करा!
सरकारने ६० वर्षांपुढील मूर्तिकारांसाठी पेन्शन योजना सुरू करावी. गणेशमूर्ती घडवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते. त्यामुळे अनेक मूर्तिकारांची मुले या व्यवसायात उतरत नाहीत. त्यामुळे या व्यवसायात इतर भाषकांचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची आवश्‍‍यकता आहे.

जागा सर्वांत मोठी समस्या
मूर्तिकारासाठी ‘जागा’ ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे सरकारने गणेशमूर्तीच्या कारखान्यांसाठी भूखंड भाडेतत्त्वावर द्यावेत, अशी मागणी ज्येष्ठ मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी केली. यंदा ठाणे पालिकेकडे महिन्यापूर्वीच गणेशमूर्ती घडवण्यासाठी जागेची मागणी केली; मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्याने मोठे नुकसान झाल्याचे त्‍यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *