डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या सोनारपाडा गावासमोर भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत ३१ वर्षीय स्कूटरस्वार जागीच ठार झाला. अपघाताची ही घटना रविवारी मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास घडली. श्रीधर लक्ष्मण राव (31) असे अपघातात ठार झालेल्या स्कूटरस्वाराचे नाव आहे. हा स्कूटरस्वार संदप-दिवा रोडला असलेल्या लोढा रिजेंसी गृहसंकुलात राहत होता. रात्रीच्या सुमारास तो एम एच 05/ एफ ई / 6119 क्रमांकाच्या त्याच्या स्कूटरवरून कल्याणकडून शिळफाट्याच्या दिशेने घराकडे निघाला होता. सोनारपाडा गावासमोर येताच पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या सी जी 07/सी एल/9940 क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात स्कूटरस्वार श्रीधर गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला. या प्रकरणी त्याचे वडील लक्ष्मण व्यंकट राव (65) यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिसांनी बेजबाबदार ट्रक चालकाच्या विरोधात भादंवि कलम 388, 279 सह मोटर वाहन 1988 चे कलम 134 (अ) (ब) 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फौजदार गणेश भांबड आणि त्यांचे सहकारी फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *