मुंबई : कोरोना लॉकडाऊनमुळे तब्बल दीड वर्षानंतर राज्यभरातील सर्व शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत मुंबई पुणे ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं विद्याथ्र्यांनी फुलून गेले होतं. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला आहे. शाळा नव्हे तर मुलांच्या भविष्याचं दारं उघडलं असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, मला माझे शाळेतले दिवस आठवताहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचा दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होतं आणि आहे. मुलं नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. आज आपण मुलांच्या विकासाचे , प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. शिक्षकाला बरे वाटत नसेल तर त्याने लगेच चाचणी करून घ्यावी. पावसाळा अजून संपला नाही. साथीचे रोगही येतात. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेऊन सर्वानी काम करावे. शाळांच्या खोल्यांची दारे बंद नको, हवा खेळती हवी, निर्जंतुकीकरण करून घ्या. निर्जंतुकीकरण करतांना देखील काळजी घ्या, मुलांच्या बसण्यात अंतर ठेवणे , मास्क घालणे, स्वच्छतालयांची स्वच्छता हवी.
कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकविले
शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विदयार्थी, शिक्षक, पालक यांना शुभेच्छा देतो. मुलांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. ती निश्चितपणे पार पडली जाईल असा मला विश्वास आहे. एकदा उघडलेली शाळा परत बंद करायची नाही या निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू असा विश्वासही मुख्यमंत्रयांनी व्यक्त केला.
शिक्षण मंत्रीही शाळेत …
आजपासून शाळा सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी काही शाळांना भेटी देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही शिक्षणमंत्र्यांचे उत्साहात स्वागत केले. डी. एस हायस्कुल सायन, कुलाबा मनपा माध्यमिक शाळा (मराठी माध्यम), ब्लॉसम एस.टी. इंग्लिश स्कूल, मरिन लाईन्स, चर्चगेट, कुलाबा मनपा शाळा (इंग्रजी माध्यम) या शाळांमध्ये प्रा. गायकवाड यांनी भेट दिली. राज्यातील इतर शाळांमध्ये शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पहिल्या दिवशी भेट दिली आहे. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु झाले आहेत. प्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज, त्याच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेली शैक्षणिक साधने यानुसार त्याच्या गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड यांनी सांगितले.